मनमाड (जि. नाशिक) : वजनदार खेळ असलेल्या वेटलिफ्टिंग खेळात आज मनमाडचे नाव जागतिक पातळीवर चमकले. मनमाडची खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने आज मेक्सिको येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. आकांक्षाचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी जागतिक खेळाडू घडविण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे.
वेटलिफ्टिंग खेळ तसा ताकदीचा खेळ, एकमेकांशी झुंज देण्याचा नाही तर स्वतःशीच झुंज देत स्वतःच्या शारीरिक मानसिक क्षमतेचा कस पाहणारा खेळ आहे. समोर प्रतिस्पर्धी जरी दिसत नसला तरी खेळाडू स्वतःच स्वतःशी स्पर्धा करून आपली मानसिकता आणि शारीरिक क्षमतेची कसोटी तपासत असतो. खेळातील सातत्य, निर्णय, शारीरिक क्षमता आणि मानसिकता या कसोटीवर खेळाडू यश संपादन करू शकतो. मात्र अशा खेळांकडे सहसा मुलींचा कल जरी दिसत नसला तरी याला मनमाड शहर अपवाद आहे. आजही शहरात वेटलिफ्टिंगमध्ये राज्यच नव्हे तर राष्ट्रीयस्तरावर सु र्णपदकांची लयलूट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे; आणि विशेषतः यात मुलींची संख्या जास्त आहे. मात्र आता पुन्हा एकदा मनमाडचे नाव जागतिक पातळीवर नोंदले गेले ते आकांक्षा किशोर व्यवहारे हिच्यामुळे. अवघ्या १५ वर्षाची असलेली आकांक्षा सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाची साथ यामुळे जागतिक पातळीवर पोचली असली तरी या खड्तर प्रवासात तिला सक्षम करणारे तिचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचा मोलाचा वाटा आहे.
गुरू गोविंद हायस्कुलमध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या आकांक्षाने जय भवानी व्यायाम शाळेत प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे धडे गिरवले. ८ वी मध्ये असल्यापासून तिने वेटलिफ्टिंगचा सराव सुरु केला पुरुषी खेळ असतांनाही आकांक्षाने मुली देखील कमी नाही असे दाखवत सक्षमपणे भार उचलित राहिली. कारण आजही समाजात मुलींनी खेळामध्ये उतरावे ही मानसिकता नाही, परंतु तिच्या आई, वडिल आणि काका प्रवीण व्यवहारे यांनी आकांक्षाला वेटलिफ्टिंगसारख्या मर्दानी खेळात पाठबळ देत तिला मर्दानी केले आणि आज त्याचे चीज झाले. घर, शाळा आणि व्यायामशाळा या पलीकडे आकांक्षाने आपला वेळ खर्ची घातला नाही. सकाळ-संध्याकाळ जयभवानी व्यायाम शाळेत प्रशिक्षक व्यवहारे यांच्या सोबत प्रॅक्टिस करत राहिली जिल्ह्यात, राज्यात अथवा देशात कुठेही स्पर्धा असो स्पर्धेत भाग घ्यायचा आणि पदक अनायचेच त्यामुळे वयाच्या १२ व्या वर्षी वेटलिफ्टिंगला सुरवात आतापर्यंत राष्ट्रीयस्तरावर दोन सुवर्णपदके प्राप्त केली असून २०२१ मध्ये पतियाळा येथे ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक व २०२२ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सुवर्णपदक व स्पर्धेतील युथ मुलींचा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आली. तर सांगली औरंगाबाद व मलकापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून भारतीय क्रीडा प्राधिकरण पंजाबच्या पटीयाळा येथे तिचा सराव सुरू होता. भारतीय संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सुद्धा आकांक्षाने जिद्द व मेहनतीच्या जोरावर उत्तम कामगिरी बजावली होती. मेक्सिकोच्या लिओन येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना ४० किलो वजनी गटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले.
मनमाडच्या क्रीडा इतिहासात जागतिक युथ वेटलिफ्टिंग मध्ये रौप्यपदक पटकावणारी आकांक्षा पहिलीच खेळाडू ठरली आहे कझाकीस्थान व कोलंबियाच्या खेळाडूंशी कडवी लढत देत असतांना आकांक्षाचे सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले. ५९ किलो स्नॅच चा तिसरा प्रयत्न आकांक्षाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळवून देणारा ठरला क्लिन जर्क मध्ये ६८ किलोचा दुसरा यशस्वी प्रयत्न झाल्यानंतर ७१ किलोचा तिसरा प्रयत्न अयशस्वी झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अतिशय कमी वयात जागतिक पातळीवर उत्तम कामगिरी करणारी आकांक्षा पुढील जागतिक स्पर्धेत नक्कीच सुवर्णपदक पटकविणार असा आशावाद प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी व्यक्त केला. आज भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशरे यांचा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांना फोन आला आणि व्यवहारे यांच्या आनंदाला परावारच उरला नाही.
प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचा वारसा पुढे नेणार ...
१९९७ पासून प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे मनमाड शहरात वेटलिफ्टिंग खेळात खेळाडूं घडवीत आहे. आजपर्यंत चारशे ते पाचशे खेळाडू त्यांनी घडविले यात ५० राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते तर सव्वाशे पुढे राज्य सुवर्ण पदक विजेते खेळाडू आहेत. जागतिकस्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये आपले खेळाडू खेळावे ही त्यांची पूर्वी पासूनची इच्छा आहे. आज त्यांची पुतणी असलेली आकांक्षा व्यवहारे हिने भारतासाठी जागतिक रौप्यपदक मिळवले तिच्या आई वडिलांपेक्षा व्यवहारे सर यांना जास्त आनंद झाला आहे. मोठ्या शहरांचा मोठा गवगवा असला तरी ग्रामीण भागातही त्याच प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रशिक्षक आहे. याचे उत्तम उदाहरण प्रवीण व्यवहारे यांच्यामुळे पुढे आले आहे. शहरातील एका मुलीने जागतिक पातळीवर भारतासाठी रौप्य कमाई केली हे त्याचेच फलित आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.