Ind vs Eng 2nd Test: इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केली भविष्यवाणी
Ind vs Eng 2nd Test Day 5: भारतीय संघ (Team India) पहिल्या डावात २७ धावांनी पिछाडीवर (Trail) राहिल्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाची वरची फळी ढेपाळली. लोकेश राहुल (KL Rahul), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या तिघांनीही झटपट आपल्या विकेट्स इंग्लंडच्या गोलंदाजांना बहाल केल्या. त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी संघाचा डाव सावरला. अतिशय चिवट खेळी करत त्यांनी दुसरे सत्र खेळून काढले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत हे दोघेही बाद झाले पण त्यांनी संघाला एक चांगली धावसंख्या गाठून दिली. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या दिशेला हा सामना ५१ टक्के झुकलेला आहे असं म्हणता येईल पण असं असलं तरी एका खेळाडूचा तासभराचा खेळ इंग्लंडच्या मनसुब्यांवर पाणी फेरू शकतो, अशी भीती इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने व्यक्त केली आहे.
दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर रोहित आणि राहुल दोघेही स्वस्तात बाद झाले. पाठोपाठ विराटही माघारी परतला. त्यानंतर पुजाराने २०६ चेंडूत ४५ धावांची अतिशय चिवट खेळी केली. त्याला अजिंक्यने १०६ चेंडूत ६१ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. या दोघांनी संघाचा डाव सावरला आणि पुढे नेला. पण चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हे दोघेही बाद झाले. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला रविंद्र जाडेजाही बाद झाला. पण असं झालं असलं तरी ऋषभ पंत आणि इशांत शर्मा हे दोघे मैदानावर आहेत. त्यापैकी ऋषभ पंतने एक तासभर जरी दमदार खेळी केली तर इंग्लंडच्या गोलंदाजांना ते झेपणार नाही, असं मत वॉनने व्यक्त केले. चार दिवसांच्या खेळानंतर सामना सध्या जरी इंग्लंडला झुकलेला दिसत आहे. पण ऋषभ पंतने तासभर चांगला खेळ केल्यास सामन्याची दिशा बदलेल, असं ट्वीट वॉनने केले.
ऋषभ पंत सध्या २९ चेंडूत १४ धावांवर खेळत आहे. भारताने चौथ्या दिवसअखेर १५४ धावांची आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत पंतची बॅट तळपली तर भारत तासभरात ५० ते ७५ धावांची भर सहज घालू शकतो. जर तसं झालं तर इंग्लंडला विजयासाठी २०० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य मिळेल आणि ते लक्ष्य पार करणं त्यांना एका दिवसात काहीसं अवघड जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंत आणि भारताच्या शेपटाला लवकर बाद करणं आणि कमीत कमी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणं हेच इंग्लंडसाठी अधिक फायद्याचं ठरू शकेल अशी भावना इंग्लिश चाहते व्यक्त करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.