९ फलंदाजांना गाठता आली नाही दोन आकडी धावसंख्या
Ind vs Eng 3rd test Live Updates: लीड्स मैदानावर इंग्लंडच्या भेदक वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजी पुरती ढेपाळली. राहुल, पुजारा, विराट, रहाणे, पंत आणि जाडेजा सर्व फलंदाज पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसले. रोहित शर्माने १०५ चेंडूंचा सामना करत एक बाजून लावून धरली होती, पण त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. जेम्स अँडरसन, ओली रॉबिन्सन, सॅम करन आणि ओव्हर्टन या चार वेगवान गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. ४० षटकांमध्ये अवघ्या ७८ धावांवर 'टीम इंडिया'चा डाव संपुष्टात आला.
लीड्ससारख्या गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर टॉस जिंकून विराटने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी करणारा लोकेश राहुल या सामन्यात पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. पाठोपाठ अनुभवी चेतेश्वर पुजारानेही निराशा केली. त्यालाही एका धावेवर माघारी परतावे लागले. रोहितला साथ द्यायला आलेल्या कर्णधार विराटकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो १७ चेंडूत ७ धावा काढत बाद झाला. मुंबईकर अजिंक्य रहाणेला चांगली सुरूवात मिळाली होती, पण 'बर्थ डे बॉय' ओली रॉबिन्सनने त्याला १८ धावांवर माघारी पाठवले. रहाणे बाद झाल्यावर पहिल्या सत्राचा खेळ थांबवण्यात आला.
दुसऱ्या सत्रात भारतीय फलंदाजांची अवस्था पहिल्या सत्रापेक्षाही वाईट गेली. केवळ ११ धावांमध्ये भारताने सहा बळी गमावले. ऋषभ पंत २ धावा काढून माघारी परतला. रोहित शर्मा अतिशय संथगतीने खेळत होता पण अखेर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. त्याने १०५ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १९ धावा केल्या. त्यानंतर धडाधड विकेट्स पडतच गेल्या. मोहम्मद शमी (०), जसप्रीत बुमराह (०), रविंद्र जाडेजा (४) पटापट बाद झाले. इंग्लंडकडून अँडरसन आणि ओव्हटनने ३-३ तर सॅम करन, ओली रॉबिन्सनने २-२ गडी बाद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.