ODI WC 2023 IND vs ENG : भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये अजून तरी अजिंक्य आहे, म्हणजेच एकही सामना गमावलेला नाही. जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ आता 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. पाच सामने जिंकल्यानंतर संघ आता सहाव्या सामन्याची तयारी करत आहे.
लखनऊच्या अटल बिहारी एकना स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू आता तेथे पोहोचले असून तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, पुढील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करता येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारतीय संघ शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला तेव्हा संघात दोन बदल करण्यात आले होते. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे तो सामना खेळला नव्हता, तर शार्दुल ठाकूरला वगळण्यात आले होते आणि त्याच्या जागी मोहम्मद शमी संधी दिली होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवला वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली होती.
आता बातम्या येत आहेत की, हार्दिक पांड्या पुढील दोन ते तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी फक्त सूर्यकुमार यादवच खेळू शकतो. पण प्रश्न लखनऊच्या खेळपट्टीचा आहे. आतापर्यंत लखनऊमध्ये झालेल्या वर्ल्ड कप सामन्यांमध्ये फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आहे.
कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी जर फिरकीपटूंसाठी उपयुक्त खेळपट्टीचा विचार केला, तर रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो. पण मग बाहेर कोण जाणार हा प्रश्न आहे.
मोहम्मद शमीने पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे त्याला संघातून बाहेर करणे सोपे जाणार नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजही चांगली गोलंदाजी करत आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या खेळाडूला वगळावे यावरून रोहितची नक्कीच डोकेदुखी वाढली आहे.
लखनऊच्या एकना स्टेडियमवर भारतीय संघ यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळणार आहेच, शिवाय इंग्लंडही पहिला सामना खेळणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या गुणतालिकेत तळाला आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर विजयाशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्या सुरू असलेली विजयी मिरवणूक कायम राहावी यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल. म्हणजेच स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.