अभा (सौदी अरेबिया) : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा पात्रता स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील भारताचे भवितव्य जून महिन्यात होणाऱ्या कुवेत आणि कतार यांच्याविरुद्धच्या सामन्यांतून निश्चित होईल, असे मत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या फेरीतील पात्रता सामन्यात भारताचा सामना उद्या गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे. अफगाणच्या तुलनेत भारतीय संघ बलाढ्य आहे, त्यामुळे विजय अपेक्षित असल्याने भारतीय संघ तिसऱ्या फेरीत स्थान मिळवेल, अशी अपेक्षा आहे. समोर प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी प्रत्येक सामना आत्मविश्वाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, मात्र आमचे मुख्य ध्येय पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचे आहे. अफगाणविरुद्धच्या सामन्यातून हे चित्र कदाचित स्पष्ट होणार नाही. त्यामुळे कुवेत आणि कतार यांच्याविरुद्धच्या सामन्यातून आमची क्षमता सिद्ध होईल, असे स्टिमॅक यांनी म्हटले आहे.
गेल्या पाच वर्षांत भारतीय संघ चौथ्यांदा अफगाणिस्तानविरुद्ध लढणार आहे. २०१९ आणि २०२१ मध्ये विश्वकरंडक पात्रता फेरीत लढती झाल्या होत्या. दोन्ही वेळेस सामने १-१ अशा बरोबरीत सुटले होते. मात्र, कोलकाता येथे झालेल्या आशिया कप पात्रता सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा २-१ असा पराभव केला होता. यात निर्णायक गोल साहल अब्दुल समदने केला होता. अफगाणिस्तानविरुद्ध उद्या होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ १५ तारखेलाच येथे आलेला आहे. सलग पाच दिवस कसून सराव केला आहे. येथील परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्यासाठी आम्ही येथे लवकर येण्याचा निर्णय घेतला, सराव मात्र नेहमीप्रमाणेच केला आहे, अशी माहिती स्टिमॅक यांनी दिली.
अफगाणिस्तानचे प्रशिक्षक ॲशले वेस्टवूड भारतीय फुटबॉल जवळून जाणतात, कारण त्यांनी बंगळूर एफसी, एटीके आणि पंजाब एफसी संघांचे प्रशिक्षकपद सांभाळलेले आहे. नोव्हेंबर महिन्यापासून त्यांनी अफगाणिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सांभाळली आहेत. आमच्या खेळाडूंचा खेळ आणि क्षमता ॲशले जाणतात, त्यामुळे आम्हाला काही नवी आखणी करावी लागेल, असे स्टिमॅक म्हणतात.
भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने वेस्टवूड यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूर एफसी संघातून आय लीग आणि फेडरेशन कप अशी दोन विजेतीपदे मिळवलेली आहेत. जवळपास सर्व भारतीयांचा खेळ वेस्टवूड जाणून असल्यामुळे उद्याच्या सामन्यात त्यांचा भर आक्रमणावर असेल; पण आम्हाला अधिक पुढचा विचार करावा लागेल, असे मत स्टिमॅक यांनी व्यक्त केले. सौदी अरेबियात आम्ही अगोदर येऊन केलेला सराव उपयोगी ठरेल, मात्र आशिया करंडक स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धची लढत आमच्यासाठी सोपी नव्हती, हेसुद्धा लक्षात ठेवून खेळ करावा लागेल, असे छेत्रीने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.