India in Paris Olympic 2024 Day 9 results: भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधील नववा दिवस चढ-उतारांचा राहिला असं म्हणालायला हरकत नाही. कारण हॉकी संघाने अविस्मरणीय विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठली. मात्र लक्ष्य सेन आणि लवलिना बोर्गोहेन यांना पराभवाचा सामना करावा लागला. एकूणच या संपूर्ण दिवसभरात भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी राहिली जाणून घेऊ.
रविवारी पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारातील क्वालिफायर्स झाले, यात भारताचे अनिश भानवाला आणि विजयवीर सिद्धू सहभागी झाले होते. विजयवीर ९ व्या क्रमांकावर आणि अनिश १३ व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही.
तसेच महिलांच्या स्कीट प्रकारात क्वालिफायर्समध्ये भारताची महेश्वरी चौहान १४ व्या क्रमांकावर राहिली, तर रिझा धिल्लोन २३ व्या क्रमांकावर राहिली.
गोल्फमध्ये पुरुषांच्या स्ट्रोक प्लेमध्ये भारताचे शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर सहभागी झाले होते. परंतु, चौथ्या फेरीनंतर शुभंकर ४० व्या क्रमांकावर राहिला, तर गगनजीत ४५ व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे त्यांची मोहिम या स्पर्धेतील संपली.
भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला शुटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.या सामन्यात भारताच्या अमित रोहिदासला १७ व्या मिनिटाला रेड कार्ड देण्यात आले होते. त्यामुळे भारताला १० खेळाडूंसह हा सामना खेळावा लागला होता. पण असं असलं तरी भारताने ब्रिटनला टक्कर दिली.
महिला ३००० स्टीपलचेसच्या पहिल्या फेरीत भारताची पारुल चौधरी पहिल्या हिटमध्ये ९.२४:४३ सेकंद वेळ नोंदवत ८ व्या क्रमांकावर राहिली. मात्र प्रत्येक हिटनंतर पहिल्या ५ क्रमांकावर राहणाऱ्या खेळाडूंनाच पुढच्या फेरीत स्थान मिळत असल्याने तिचे आव्हान संपले.
तसेच लांब उडीमध्ये भारताचा जेस्विन अल्ड्रिन ब गटात १३ व्या क्रमांकावर राहिला. मात्र दोन्ही गटातील मिळून सर्वोत्तम केवळ १२ खेळाडूंनाच पुढच्या फेरीत जाता येत असल्याने त्याचंही आव्हान संपलं.
महिला ७५ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लवलिना बोर्गोहेनला चीनच्या ली क्विएनविरुद्ध ४-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचं पदकही हुकलं. याशिवाय तिच्या पराभवाबरोबरच पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं बॉक्सिंगमधील आव्हानही संपले.
बॅडमिंटनमधील पुरुष एकेरी गटातील उपांत्य सामन्याच भारताच्या लश्र्य सेनला डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेनने २०-२२, १४-२१ अशा सरळ दोन गेममध्ये पराभूत केले.त्यामुळे लक्ष्य सेन सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद झाला असला, तरी त्याला आता कांस्य पदक मिळवण्याची संधी आहे. त्याचा कांस्य पदकाचा सामना मलेशियाच्या झी जिया ली याच्यावरुद्ध सोमवारी होणार आहे.
महिलांच्या डिंघीमध्ये नेत्रा कुमनन आठव्या शर्यतीनंतर ३१ व्या क्रमांकावर राहिली. तसेच पुरुषांच्या डिंघीमध्ये विष्णू सर्वनन आठव्या शर्यतीनंतर २४ व्या क्रमांकावर राहिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.