अहमदाबाद : भारत-पाकिस्तान यांच्यामधील एकदिवसीय विश्वकरंडकातील लढत १४ ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आशिया खंडातील दोन शेजारी देशांमधील लढतीला युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियमला छावणीचे रूप प्राप्त झाले आहे. या लढतीसाठी ११ हजारांपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
एका वृत्तानुसार मुंबई पोलिसांना ई-मेल आला असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजा करण्याची आणि अहमदाबादमधील स्टेडियम उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली. ज्या व्यक्तीकडून ई-मेल पाठवण्यात आला, त्या व्यक्तीने ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच गुंड लॉरेंस बिश्नोई यांची तुरुंगातून सुटका करण्याचीही मागणी केली. या ई-मेलबाबत अहमदाबादमधील पोलिस आयुक्त जी. एस. मलिक यांनी सांगितले की, ‘‘आम्ही अशा धमक्यांचे मूल्यांकन केले आहे.
त्यानुसार आम्ही योजना तयार केली आहे. शिवाय सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक येणार असताना विस्तृत सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. हा एक संवेदनशील सामना असेल. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते हे देखील आम्ही लक्षात घेतले.’’ दरम्यान, हा ई-मेल परदेशातून आलेला आहे, अशी माहिती मिळाली असली तरी अहमदाबादमधील शहर पोलिस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
मलिक पुढे म्हणाले, ७ हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांसह स्टेडियमच्या सुरक्षिततेसाठी आणि सामन्यादरम्यान शहरातील सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जवळपास चार हजार होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. या जवानांव्यतिरिक्त तीन ‘हिट टीम’चीही व्यवस्था असणार आहे. एनएसजीची एक ड्रोन विरोधी टीम, बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाच्या नऊ पथकांचीही निवड करण्यात आली आहे.
स्टेडियममध्ये तालीम सुरू
राज्य राखीव पोलिसांच्या १३ कंपन्यांव्यतिरिक्त आम्ही आमच्या सुरक्षा विभागाच्या रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तीन कंपन्या तैनात करणार आहोत. आरएएफद्वारे शहरातील सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. चेंगराचेंगरीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी आधीच योजना तयार केली आहे. स्टेडियममध्ये याची तालीम देखील सुरू आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केले.
२० वर्षांमध्ये हिंसाचार झालेला नाही
अहमदाबादमध्ये गेल्या २० वर्षांमध्ये क्रिकेटच्या सामन्यावरून सांप्रदायिक हिंसाचार झालेला नाही. मात्र ‘बीसीसीआय’कडून पाकिस्तानात आशिया करंडकासाठी खेळण्यास नकार दिला आणि ही स्पर्धा श्रीलंकेत हलवण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांच्या व्हिसा प्रकरणावरूनही वाद सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.