India vs Bagladesh, 2nd Test at Kanpur: भारत आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सध्या सुरू आहे. कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताकडून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. या सामन्यावर पहिल्या दिवसापासून पावसाचे सावट होते.
पावसामुळे या सामन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नव्हता. त्यामुळे आता या सामन्यातील केवळ दोन दिवसांचा खेळ उरला आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून फलंदाजीवेळी आक्रमकता दिसून आली आहे. त्यामुळे भारताच्या नावावर एक मोठा विक्रमही झाला आहे.
बांगलादेशने पहिल्या डावात ७४.२ षटकात सर्वबाद २३३ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला.
भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनीही आक्रमक सुरुवात करताना पहिल्या तीन षटकातच भारताला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. त्यानंतर रोहित चौथ्या षटकात ११ चेंडूत २३ धावा करून बाद झाला.
त्यानंतर जैस्वालला साथ देण्यासाठी शुभमन गिल आला. या दोघांनीही धावांची गती राखली आणि अवघ्या १०.१ षटकात भारताला १०० धावांचा टप्पा गाठून दिला. त्यामुळे भारताने कसोटीमध्ये सर्वात कमी षटकात १०० धावा पूर्ण करण्याचा नवा विश्वविक्रम केला.
यापूर्वीही हा विक्रम भारताच्याच नावावर होता. याआधी भारताने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनला झालेल्या कसोटीत १२.२ षटकात १०० धावा पूर्ण केल्या होत्या.
१०.१ षटके - भारत विरुद्ध बांगलादेश, कानपूर २०२४
१२.२ षटके - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, २०२३
१३.१ षटके - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कोलंबो, २००१
१३.४ षटके - बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, मीरपूर, २०१२
१३.४ षटके - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, कराची, २०२२
१३.४ षटके - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, रावळपिंडी, २०२२
१३.६ षटके - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, पर्थ, २०१२
दरम्यान, या सामन्यात रोहित बाद झाल्यानंतर जैस्वालने गिलबरोबर फलंदाजी करताना आक्रमक खेळ सुरू ठेवला होता. जैस्वालने गिलबरोबरच्या भागीदारीदरम्यान त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्याने अवघ्या ३१ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
त्यामुळे भारताकडून हे कसोटीतील चौथ्या क्रमांकाचे सर्वात जलद अर्धशतक ठरले. पण अर्धशतकानंतर तो ५१ चेंडूत ७२ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने १२ चौकार आणि २ षटकार मारले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.