india vs pakistan memorable odi encounters between the arch rivals asia cup 2023  Sakal
क्रीडा

Asia Cup 2023 : भारत-पाक लढतीचा नवा अध्याय

विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज आशिया करंडक स्पर्धेत झुंज

सुनंदन लेले

पल्लिकेले : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटले की क्रिकेट जगताची नजर एक जागी स्थिरावते. नुसते दोन देशांतील खुन्नसच्या नातेसंबंधाचे कारण या लढतीच्या आकर्षणाला नसते, तर दर्जेदार क्रिकेट बघायला मिळणारच, याची शाश्वती प्रेक्षकांना असते.

भावना अनावर असतात आणि दोनही देशांचे पाठीराखे, कशीही करून ही लढत जिंका, असे सांगत असतात. थोडक्यात एक प्रकारची करकरीत धार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला असते. शनिवारी पल्लिकेले मैदानावर होणारा सामना त्याला अपवाद नसेल.

नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या टी- २० वर्ल्डकप सामन्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान लढत रंगणार आहे. दोन्ही संघांच्या सामना खेळणाऱ्‍या संभाव्य नावांवर नजर टाकली तर काहीच डावे उजवे करता येत नाही.

दोन्ही संघांकडे तीन दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत. दोन्ही संघाचे कप्तान आपले कर्तृत्व सिद्ध केलेले फलंदाज आहेत. दोन्ही संघांकडे डावखुरा मंदगती गोलंदाज, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो. अर्थात पाकिस्तान विरुद्धचा सामना म्हटल्यावर पेटून उठून खेळणारा विराट कोहली भारतीय संघात आहे हे कोणीच विसरत नाही.

सर्वात लक्षणीय लढतीसाठी पल्लिकेले स्टेडियमवरची खेळपट्टी भरपूर रोलिंग केलेली असेल. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात दिसून आले आहे की, वेगवान गोलंदाजांनी टाकलेला चेंडू चांगलाच उसळी घेत होता आणि विकेट किपरपर्यंत सहजी पोहोचत होता.

याचाच अर्थ असा की, शनिवारच्या लढतीत शमी-बुमरा-सिराज आणि समोर शाहीन आफ्रिदी-नसीम शाह-हॅरीस राऊफ फलंदाजांना चांगलेच प्रश्न विचारणार आहेत. असे चित्र आहे.

पहिली गोलंदाजी करणाऱ्‍या संघाला खेळपट्टीच्या ताजेपणाचा थोडा फायदा नक्की होईल. भारतीय फलंदाजांना डाव्या हाताने मारा करणारा शाहीन आफ्रिदी ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना हवेत बाहेर जाणारा चेंडू टप्पा पडल्यावर आत आणतो, त्या अस्त्राचा सामना भक्कमपणे करावा लागेल.

भारतीय संघाला ईशान किशनला सलामीला खेळवायचा मोह पडणार आहे. तसे केल्यास विराट कोहली तीन क्रमांकावर नेहमीप्रमाणे फलंदाजीला येतो का तिसऱ्‍या क्रमांकावर शुभमन गिलला पाठवून विराट चौथ्या क्रमांकावर येतो, याची उत्सुकता आहे.

ईशान किशन मधल्या फळीत जास्त प्रभावी ठरत नाही, तसेच तो डावखुरा असल्याचा फायदा घेतला जाऊ शकतो हा मुद्दा आहे. पहिल्या सामन्यात बाबर आझम आणि इफ्तीकारने केलेली मोठी शतके पाकिस्तान संघाचा विश्वास वाढवणारी होती. बाबर आझमला लवकर बाद करण्यात ज्या भारतीय गोलंदाजाला यश येईल तो हिरो होईल, हे नक्की!

पाऊस आहे, पण त्रासदायक नाही

शनिवारच्या सामन्यादरम्यान पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवला जात असल्याने सगळीकडे सामन्याबरोबर पावसाची चर्चा आहे. चौकशी करता असे समजते आहे की होय, शनिवारी पाऊस पडणार आहे, पण सामना धुतला जाईल इतकाही पडणार नाही.

एकच काळजी प्रेक्षकांना घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे सामन्याला हजेरी लावताना छत्री किंवा हलका रेनकोट बरोबर ठेवावा लागणार आहे. संयोजकांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन मैदानावर कव्हर्स टाकायला लागणाऱ्‍या कर्मचाऱ्‍यांची संख्या सरळ दुप्पट केली आहे.

आदर आणि प्रेम

बाबर आझम आणि विराट कोहली दोन संघाच्या फलंदाजीचे मुख्य तारे आहेत. मैदानावर एकमेकांवर तुटून पडणारे हे दोन खेळाडू प्रत्यक्षात एकमेकांबद्दल खूप प्रेम, आदर बाळगून आहेत. बाबर आझमच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या तेव्हा विराट कोहलीने बाबरची बाजू उचलून धरताना तो महान फलंदाज आहे...

हा एक काळ आहे कमी धावांचा, पण तो लवकरच मोठी खेळी करू लागेल, अशी पाठराखण केली होती. विराट कोहलीसारखा महान फलंदाज जेव्हा खराब काळात तुम्हाला धीर देतो तेव्हा फार मोठा आधार मिळतो...म्हणूनच विराट महान फलंदाज आणि चांगला माणूस आहे, बाबर आझम म्हणतो.

बाबर आझमचा सध्याचा फॉर्म बघता तोच सध्याचा सर्वोत्तमपैकी एक फलंदाज असल्याचे विराट उघड कौतुक करताना म्हणतो. या सगळ्यामधून दिसून येते की मैदानावर एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन फलंदाज खासगीत मित्र आहेत आणि एकमेकांबद्दल आदर बाळगून आहेत.

दृष्टिक्षेपात

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीला १०२ धावा हव्यात.

  • १९ एकदिवसीय शतक करणारा बाबर आझम पाककडून सर्वाधिक शतके करणाऱ्या सईद अन्वरपेक्षा एक शतक दूर

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळींचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी रवींद्र जडेजाला सहा विकेटची गरज. अशी कामगिरी केल्यास तो सातवा भारतीय.

  • एकमेकांविरुद्ध गेल्या १० एकदिवसीय सामन्यात.

  • भारताचे ७ तर पाकचे ३ विजय

आशिया करंडक स्पर्धेत आमनेसामने

एकूण लढती ः १३. भारत विजय ः ७. पाकचे विजय ः ५. अनिर्णित ः १

संघ यातून निवडणार ः

भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा.

पाक ः बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमान उल हक, मोहम्मद रिझवान, अघा सलमान, इफ्तेकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाझ, शहीन शाह अफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ

वेळ ः दुपारी ३ पासून ः

थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टस, हॉटस्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT