India Youth Players Perfect Move in Chess Olympiad Pravin Thipsay sakal
क्रीडा

बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील भारताच्या युवा खेळाडूंची अचूक चाल; प्रवीण ठिपसेंची कौतुकाची थाप

प्रवीण ठिपसे पुढे म्हणाले, विश्‍वनाथन आनंद हे महान खेळाडू आहेत; मात्र ते भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावता आले नाही.

सकाळ वृत्तसेवा

- जयेंद्र लोंढे

मुंबई : भारताने बुद्धिबळ ऑलिंपियाडमधील पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांत सुवर्णपदक पटकावताना अद्‌भूत कामगिरी केली. डी. गुकेश, अर्जुन इरिगेसी, आर. प्रज्ञानंद या युवा खेळाडूंनी पुरुष विभागात, तर महाराष्ट्राची दिव्या देशमुख व वंतिका अग्रवाल यांनी महिला विभागात लक्षवेधक प्रदर्शन केले.

अर्जुन पुरस्कारप्राप्त, ग्रँडमास्टर व फिडे वरिष्ठ ट्रेनर प्रवीण ठिपसे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी युवा खेळाडूंनी केलेल्या अचूक चालींचे कौतुक केले. प्रवीण ठिपसे पुढे म्हणाले, विश्‍वनाथन आनंद हे महान खेळाडू आहेत; मात्र ते भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावता आले नाही.

कारण त्यावेळी भारतीय संघातील इतर खेळाडू क्रमवारीतही मागे होते. यंदा पाचपैकी दोन खेळाडू हे अव्वल दहा क्रमवारीतील आहेत. डी. गुकेश व अर्जुन इरीगेसी यांचा त्यामध्ये समावेश आहे. आर. प्रज्ञानंदही मागे नाही. याचा फायदा भारताला यंदा झाला.

अर्जुन इरीगेसी यांची क्रमवारी डी. गुकेश याच्यापेक्षा चांगली होती. त्याचे रेटींगही चांगले होते; पण डी. गुकेश याने गेल्या काही काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, तसेच त्याच्यामध्ये कोणत्याही खेळाडूला हरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये त्याची पहिल्या बोर्डसाठी निवड करण्यात आली.

त्याच्यावर टाकलेला विश्‍वासही त्याने सार्थ ठरवला. अर्जुन इरीगेसी याला तिसऱ्या बोर्डवर खेळवले. खरेतर आर. प्रज्ञानंदऐवजी त्याला दुसऱ्या बोर्डवर खेळवायला हवे होते. कारण या स्पर्धेमध्ये गुकेशसह अर्जुन याने चमक दाखवली. प्रज्ञानंद याला अव्वल दर्जाचा खेळ करता आला नाही; पण तरीही एकूण कामगिरी छान झाली, असे प्रवीण ठिपसे यांनी ठामपणे सांगितले.

एकच ध्येय

सध्याच्या जनरेशनमधील युवा खेळाडू हे अधिक फोकस आहेत. आपले ध्येय साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात. डी. गुकेश हा तर इतका शांत खेळाडू आहे की, तो जास्त बोलतही नाही. आर. प्रज्ञानंदनेही मोठा त्याग केलेला आहे. सिनेमा, नाटक, व्हॉट्‌सॲप यामध्ये वेळ घालवणे त्यांना आवडत नाही, असे प्रवीण ठिपसे स्पष्ट सांगतात.

दिव्या, वंतिकाने तारले

महिला विभागात कोनेरू हंपी ही अनुभवी खेळाडू बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये सहभागी होऊ शकली नाही. त्यामुळे पहिल्या बोर्डवर खेळताना भारताला महिला विभागात अडचण आली; पण दिव्या देशमुख व वंतिका अग्रवाल या दोन युवा महिला खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. यामुळे महिला विभागालाही उत्तुंग झेप घेता आली.

पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांत एकूण चार बोर्डवर खेळाडू लढतात. संघातील अव्वल खेळाडू पहिल्या बोर्डवर सहसा खेळत असतो. त्यानुसार पुढील तीन बोर्डवरील खेळाडू ठरवले जातात, असेही प्रवीण ठिपसे यांनी सांगितले.

२०२६मध्ये दोन भारतीय लढणार

प्रवीण ठिपसे यांनी २०२६मध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद लढतीत दोन भारतीय खेळाडू एकमेकांसमोर येतील, असे भाकीत वर्तवले आहे. ते म्हणतात, आगामी काळात डिंग लिरेन व डी. गुकेश यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाची लढत रंगेल.

ही लढत डी. गुकेश अगदी सहज जिंकेल. त्यामुळे २०२६मध्ये अंतिम फेरीतील त्याचे स्थान पक्के असेल. त्याच्यासमोर भारताचाच खेळाडू असेल. चॅलेंजर (आव्हानवीरांची स्पर्धा) स्पर्धेत अर्जुन इरीगेसी किंवा आर. प्रज्ञानंद यांच्यापैकी एक खेळाडू गुकेशला आव्हान देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT