बुसान (दक्षिण कोरिया) : भारताच्या महिला संघाने जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धेतील गट एकमध्ये सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घातली. रविवारी हंगरीवर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारताच्या महिला संघाने सोमवारी उझबेकिस्तानवर ३-० असा दणदणीत विजय साकारला.
अर्चना कामत हिने पहिल्या लढतीत रिम्मा गुफ्रानोवा हिच्यावर ११-७, ११-३, ११-६ असा विजय मिळवत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्टार खेळाडू मनिका बत्रा हिने मार्खाबो मॅगदिएवा हिच्यावर ११-७, ११-४, ११-१ असा सहज विजय मिळवला आणि भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. तिसऱ्या लढतीत दिया चितळे हिने रोझालिना खादजिएवा हिचे कडवे आव्हान ११-६, १०-१२, ११-४, ११-६ असे परतवून लावले. या विजयासह भारताने या लढतीत ३-० अशी बाजी मारली. भारतीय महिला संघासमोर पुढील लढतीत स्पेनचे आव्हान असणार आहे.
पुरुष संघाची पुन्हा हार
भारतीय महिला टेबल टेनिस संघाने विजय मिळवला असतानाच भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाला मात्र पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. सलामीच्या लढतीत चिलीला पराभूत करणाऱ्या भारतीय पुरुष संघाला रविवारी पोलंडकडून ३-१ अशी हार पत्करावी लागली होती. पुरुष संघाला सोमवारी दक्षिण कोरियाकडून ३-० अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. हरमीत देसाई, जी. साथियाना व शरथ कमल या तीनही अनुभवी खेळाडूंकडून निराशा झाली. त्यामुळे भारताचा पराभव झाला. आता गट तीनमधील अखेरच्या लढतीत भारतीय संघ न्यूझीलंडला सामोरा जाणार आहे.
गट एक ताजा गुणतक्ता (महिला विभाग)
१) चीन - चार विजय, आठ गुण
२) भारत - दोन विजय, पाच गुण
३) हंगरी - एक विजय, चार गुण
४) स्पेन - एक विजय, चार गुण
५) उझबेकिस्तान - तीन गुण
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.