Indian women's team scripted history – भारतीय महिला टेबल टेनिस संघाने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी केली. कझाकस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाने रोमहर्षक विजय मिळवला. भारतीय महिला संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाला ३-२ अशी मात दिली. उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताने या स्पर्धेतील पदक पक्के केले आणि हे या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे पहिले पदक ठरले आहे.
अहिका मुखर्जी या सामन्यातील स्टार ठरली. तिने पहिला व शेवटचा सामना जिंकून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. अनुभवी मनिका बात्राने दुसरा सामना जिंकताना भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली, परंतु चौथ्या सामन्यात हार झाल्याने मॅच २-२ अशी बरोबरीत आली. अहिकाने पाचवा व निर्णायक सामना जिंकून भारताचे या स्पर्धेतील पहिले पदक निश्चित केले.
अहिकाने पहिल्या सामन्यात कोरियाच्या युबिन शिनचा ३-२ असा पराभव केला. अहिकाने पहिला सेट घेतल्यानंतर युबिनने कमबॅक केले आणि सामना २-२ असा बरोबरीत आला होता. पण, पाचव्या सेटमध्ये अहिकाने ११-७ अशा विजयासह भारताला आघाडी मिळवून दिली. मनिकाने दुसऱ्या सामन्यात १२-१४, १३-११, ११-५, ५-११, १२-१० अशा अटीतटीच्या लढतीत झिई जिऑनला ५० मिनिटांत हार मानण्यास भाग पाडले. पण, श्रीजा अकुला व मनिका बात्रा यांना पराभव पत्करावा लागल्याने सामना २-२ असा बरोबरीत आला. अहिकासमोर जिऑनचे आव्हान होते आणि तिला पहिला सेट गमवावा लागला. त्यानंतर अहिकाने जोरदार पुनरागमन केले आणि ४० मिनिटांत बाजी मारून भारताचे ऐतिहासिक पदक पक्के केले.
अहिका मुखर्जी वि. वि. युबिन शिन ११-९, ७-११, १२-१०, ७-११, ११-७
मनिका बात्रा वि. वि. झिई जिऑन १२-१४, १३-११, ११-५, ५-११, १२-१०
श्रीजा अकुला पराभूत वि. इयून्ही ली ६-११, १०-१२, ८-११
मनिका बात्रा पराभूत वि. युबिन शिन ११-१३, ४-११, ११-६, ११-७, १०-१२
अहिका मुखर्जी वि. वि. झिई जिऑन ७-११, ११-६, १२-१०, १२-१०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.