भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले अफगाणिस्तानचे आव्हान संपलेले असले तरी त्यांनी प्रभावशाली कामगिरी केली. ट्वेन्टी-२० प्रकारातही त्यांचा खेळ उजवा ठरत असतो, त्यामुळे २०२८ च्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरणे त्यांना कठीण नसेल, मात्र त्यांच्या देशात पुरुष-महिलांना समान दर्जा दिला जात नसल्यामुळे अफगाणचा संघ ऑलिंपिकमधून बाहेर राहू शकेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ जिऑफ अलार्डिस यांनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणतात, ‘‘लॉस एंजलिसमध्ये २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत समावेश होत असलेल्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा विचार करायचा की नाही हा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती घेईल. खेळातही महिलांना पुरुषांप्रमाणे समान न्याय आणि संधी देण्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख सूत्र आहे.
जवळपास १०० वर्षांनंतर क्रिकेट खेळाचे ऑलिंपिकमध्ये पुनरागमन होत आहे. अफगाणिस्तानचा पुरुषांचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रगती करत असला तरी त्यांच्या राज्यकर्त्यांनी महिलांसाठी क्रिकेट बंद केले आहे. एकीकडे ऑलिंपिक चळवळीचे प्रमुख सूत्र महिलांना समान न्यायाचे असताना अफगाण देश जर महिलांना दुय्यम स्थान देत असेल तर अफगाणच्या पुरुष क्रिकेट संघासाठी ऑलिंपिकचे दरवाजे बंद असतील, अशी दाट शक्यता आहे.
या निर्णयात आयसीसीचा कोणताही हस्तक्षेप नसेल, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे निर्णय स्पष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये आम्ही कोणतेही भाष्य करणार नाही, असे अलार्डिस म्हणाले.
अफगाणिस्तानचा महिलांचाही क्रिकेट संघ खेळत होता; परंतु तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर ऑगस्ट २०२१ पासून महिलांसाठी क्रिकेटचे दरवाजे बंद केले. अशी सध्याची स्थिती असली तरी आयसीसी तालिबान राज्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे महिला क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
केवळ क्रिकेटच नव्हे तर अफगाणिस्तानचे कोणत्याही खेळातील खेळाडू महिलांना समान न्याय न दिल्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळू शकणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.