बंगळूर : रजत पाटीदारची अर्धशतकी खेळी (५२ धावा), यश दयालची प्रभावी गोलंदाजी (३/२०) व कॅमेरुन ग्रीनच्या अष्टपैलू कामगिरीच्या (नाबाद ३२ धावा, १/१६, एक धावचीत) जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने रविवारी झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर ४७ धावांनी विजय साकारला. बंगळूरचा हा सलग पाचवा विजय ठरला. दिल्लीला सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
बंगळूरकडून दिल्लीसमोर १८८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पण डेव्हिड वॉर्नर (१ धाव), जेक फ्रेसर मॅकगर्क (२१ धावा), अभिषेक पोरेल (२ धावा), शाई होप (२९ धावा), कुमार कुशाग्र (२ धावा) व ट्रिस्टन स्टब्स (३ धावा) या फलंदाजांकडून निराशा झाली. कर्णधार अक्षर पटेल याने ५७ धावांची खेळी साकारत एकाकी झुंज दिली. पण दिल्लीचा डाव १४० धावांवरच संपुष्टात आला.
त्याआधी दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी असल्यामुळे अक्षर पटेलकडे दिल्लीचे नेतृत्व सोपवण्यात आले. फाफ ड्युप्लेसी व विराट कोहली या सलामीवीरांना या लढतीत सूर गवसला नाही. मुकेशकुमारच्या गोलंदाजीवर ड्युप्लेसी सहा धावांवर बाद झाला. त्याचा सुमार फॉर्म कायम राहिला. विराटला या लढतीत अपयश आले. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर तो २७ धावांवर बाद झाला.
विल जॅक्स व रजत पाटीदार या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करताना बंगळूरची धावसंख्या पुढे नेली. रजतने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आणखी एक अर्धशतक साजरे केले. त्याने ३२ चेंडूंमध्ये तीन चौकार व तीन षटकारांसह ५२ धावांची खेळी साकारली. रसिख सलामच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर जॅक्सही ४१ धावांवर बाद झाला. कॅमेरुन ग्रीनने नाबाद ३२ धावांची खेळी केल्यामुळे बंगळूरला २० षटकांमध्ये आठ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - २० षटकांत आठ बाद १८७ धावा (विराट कोहली २७, विल जॅक्स ४१, रजत पाटीदार ५२, कॅमेरुन ग्रीन नाबाद ३२, खलील अहमद २/३१, रसिख सलाम २/२३, मुकेशकुमार १/२३) विजयी वि. दिल्ली कॅपिटल्स - १९.१ षटकांत सर्व बाद १४० धावा (अक्षर पटेल ५७, यश दयाल ३/२०, लॉकी फर्ग्युसन २/२३),
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.