नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आयपीएलचे उर्वरित वेळापत्रक तयार करण्यात आले; परंतु त्यानंतर काही दिवसांतच दोन सामन्यांच्या तारखांत बदल करण्यात आला. हे बदल का करण्यात आले याची कारणे बीसीसीआयने मात्र दिली नाहीत.
कोलकता आणि अहमदाबाद येथील सामन्यांत बदल करण्यात आले आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार १७ एप्रिल रोजी ईडन गार्डनवर कोलकता आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार होता. तो आता एक दिवस अगोदर म्हणजेच १६ एप्रिल रोजी करण्यात आला आहे. त्याचमुळे अहमदाबादमधील गुजरात विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी खेळवण्यात येईल. कोलकता आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याची तारीख रामनवमीमुळे बदलली जाऊ शकते, असे वृत्त पीटीआयने कालच दिले होते, बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे बदलाची माहिती दिली; परंतु त्यात कारण स्पष्ट केले नाही.
अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १६ एप्रिल रोजी सामना होणार होता. हा सामना आता १७ एप्रिल रोजी होईल, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. ईडन गार्डनवर कोलकता आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर तीन दिवसांत कोलकता आणि लखनौ यांच्यात लढत होणार आहे.
इतक्या लगेचच होणाऱ्या सामन्यासाठी आम्ही पुरेशी सुरक्षा व्यवस्था देऊ शकत नाही, असे कोलकाता पोलिसांनी सांगितल्यामुळे १७ तारखेचा सामना १६ तारखेला करण्यात आल्याचे समजते. १७ तारखेला रामनवमी आणि निवडणुकांचा कार्यक्रम त्यामुळे १७ तारखेच्या सामन्यासाठी सुरक्षिततेचा प्रश्न येऊ शकतो, अशा आशयाचे पत्र कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांना दिले आहे.
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी काही ठिकाणी मतदान होणार आहे. स्थानिक पोलिसांनी सामन्याच्या तारखेत बदल करण्याची मागणी केल्याचे आम्हाला बंगाल क्रिकेट संघटनेने कळवले असल्याच्या वृत्ताला बीसीसीआयने दुजोरा दिला.
तारखा बदललेले सामने
१६ एप्रिल : कोलकता वि. राजस्थान (कोलकता)
१७ एप्रिल : गुजरात वि. दिल्ली (अहमदाबाद)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.