Chennai Super Kings Vs Kolkata Knight Riders : गतविजेता चेन्नई सुपरकिंग्सला दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांकडून सलग दोन लढतींत हार पत्करावी लागली. आता उद्या ॠतुराज गायकवाडच्या चेन्नईसमोर सलग तीन लढतींत विजय मिळवणाऱ्या कोलकता नाईट रायडर्सचे आव्हान असणार आहे. चेन्नईचा संघ सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरील, तर कोलकता संघ विजयाचा चौकार मारण्यासाठी जीवाचे रान करील.
कर्णधार ॠतुराज गायकवाड व राचिन रवींद्र या दोन सलामीवीरांकडून यंदाच्या मोसमात लक्षणीय कामगिरी झालेली नाही. त्यामुळे दोघांनाही कोलकताविरुद्धच्या लढतीत चमक दाखवावी लागणार आहे. शिवम दुबे याने १६०च्या सरासरीने १४८ धावांची फटकेबाजी केली असल्यामुळे त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या आशा आहेत. समीर रिझवी या युवा खेळाडूला संघात संधी मिळेल की नाही याबाबत सांगणे कठीण आहे. महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा खालच्या क्रमांकावर फलंदाजी येईल हेही निश्चित आहे.
मुस्तफिजूर रहमान व मथीशा पथिराना हे दोन प्रमुख गोलंदाज काही कारणास्तव मागील लढत खेळू शकले नाही. पुन्हा त्यांची अनुपस्थिती असल्यास चेन्नईची गोलंदाजी विभागात चिंता वाढू शकते. तसेच अशा परिस्थितीत तुषार देशपांडे, दीपक चहर, मुकेश चौधरी या वेगवान गोलंदाजांसह मोईन अली, रवींद्र जडेजा व माहीश तीक्षणा या फिरकी गोलंदाजांवर चेन्नईच्या गोलंदाजीची मदार असणार आहे.
राजस्थानप्रमाणे कोलकता संघही शानदार खेळ करीत आहे. त्यांचे फलंदाज आक्रमक फलंदाजीवर जोर देत आहेत. सुनील नारायण याला सलामीला पाठवण्याचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडत आहे. त्याच्याकडून अप्रतिम फलंदाजी होत आहे. फिल सॉल्टही छान खेळ करीत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर व रमणदीप सिंग यांच्याकडून सातत्यपूर्ण खेळाची गरज आहे. आंद्रे रसेल व रिंकू सिंग यांच्याकडून मधल्या फळीत चमकदार खेळाची अपेक्षा करू शकतो. याच पार्श्वभूमीवर चेन्नईच्या गोलंदाजांसमोर उद्या कडवे आव्हान असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कोलकता संघाचा गोलंदाजी विभाग प्रभावी कामगिरी करीत आहे. विक्रमी बोलीवर संघात घेतलेल्या मिचेल स्टार्क याला सुरुवातीला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण मागील लढतीपासून त्याच्यासह वरुण चक्रवर्तीही ठसा उमटवत आहे. हर्षित राणा, आंद्रे रसेल व वैभव अरोरा यांच्याकडून प्रतिस्पर्धी फलंदाजांना बांधून ठेवले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.