Gautam Gambhir on Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वात यंदा मुंबईला फार काही खास करता आलेलं नाही. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतूनही सर्वात आधी बाहेर पडले.
यादरम्यान, हार्दिकवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनीही हार्दिकच्या नेतृत्वावर निशाणा साधला होता. मात्र आता त्यांना भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने तिखट शब्दात उत्तर दिले आहे.
हार्दिक 2015 ते 2021 दरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर 2022 आणि 2023 आयपीएल हंगाम कर्णधार म्हणून गुजरात टायटन्सकडून खेळला. यावेळी त्याच्या नेतृत्वात सलग दोन्ही हंगामात गुजरातने अंतिम सामना गाठला. 2022 मध्ये गुजरातने विजेतेपदालाही गवसणी घातली, तर 2023 मध्ये गुजरात उपविजेते ठरले.
परंतु, यानंतर आयपीएल 2024 आधी मुंबईने हार्दिकला ट्रेडिंगमधून पुन्हा संघात घेतले. तसेच हार्दिककडे रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवत नेतृत्वही सोपवले. त्यामुळे अनेकांना ही गोष्ट पटली नाही. त्यामुळे आयपीएल 2024च्या सुरुवातीपासूनच हार्दिक आणि मुंबई संघावर टीका होत होत्या.
त्यातच आता हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईची आयपीएल 2024 मधील कामगिरीही फारशी चांगली झालेली नाही. यादरम्यान, एबी डिविलियर्स काही दिवसांपूर्वीच हार्दिकच्या देहबोलीवर टीका केली होती.
यानंतर आता गंभीरने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना डिविलियर्स आणि पीटरसनला फटकारले आहे. तसेच हार्दिकला पाठिंबा दिला आहे. त्याने म्हटले आहे की मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिकचा हा पहिलाच हंगाम होता. त्यामुळे त्याला थोडा वेळ द्यावा लागेल.
गंभीर म्हणाला, 'क्रिकेट तज्ञ काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. ते त्यांचं काम आहे. माझं मत आहे की तुम्ही एखाद्याच्या नेतृत्वाची पारख त्याच्या संघाच्या कामगिरीवरून करता. जर मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली असती, तर याच तज्ञांनी त्याचे कौतुक केले असते. आत्ता मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली झालेली नाही आणि त्यामुळेच सर्वजण त्याबद्दल बोलत आहेत.'
'हे समजून घ्यायला पाहिजे की हार्दिक पांड्या दुसऱ्या फ्रँचायझीमधून आला आहे, त्यामुळे वेळ लागतो, त्याला थो़डा वेळ द्या.'
'गुजरातचे दोन वर्षे नेतृत्व केल्यानंतर मुंबईसाठी त्याने अचानक चांगली कामगिरी करून दाखवावी अशी तुमची अपेक्षा आहे. तो अशी कामगिरी करूही शकतो. मी असं म्हणणार नाही की तो करू शकणार नाही, पण जर तो तसं करू शकला नसेल, तरी ठीक आहे ना. त्याला थोडा वेळ द्या.'
त्याचबरोबर डिविलियर्स आणि पीटरसनला फटकारताना गंभीर म्हणाला, 'प्रत्येक दिवशी, प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक गोष्टीत त्याला पारखणे योग्य नाही. ज्या तज्ञांनी त्याच्यावर टीका केली आहे, त्यांनी आधी स्वत: नेतृत्व करतानाच्या कामगिरीचाही विचार करायला हवा. जरी तो एबी डिविलियर्स असो किंवा केविन पीटरसन.'
'मला वाटत नाही त्यांनी त्यांच्या नेतृत्त्वात खास काही केले आहे. जर तुम्ही त्यांची आकडेवारी पाहिली, तर ती इतर कोणत्याही कर्णधारांपेक्षा खराब असेल. त्यामुळे तुम्ही साम्य असलेल्या गोष्टींची तुलना करू शकता, विभिन्न गोष्टींची नाही.'
हार्दिकच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने 13 सामन्यांमध्ये 4 विजय मिळवले आहेत, तर 9 सामने पराभूत झाले आहेत. आता या हंगामातील त्यांचा अखेरचा सामना बाकी असून हा सामना 17 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.