Gujarat Titans Vs Chennai Super kings IPL 2024 Point Table : गतविजेता चेन्नई सुपरकिंग्सचा संघ उद्या (ता. १०) होणार असलेल्या आयपीएल लढतीत गुजरात टायटन्सचा सामना करणार आहे. प्ले ऑफच्या फेरीत पोहोचण्यासाठी चेन्नईला विजयाची नितांत गरज आहे. गुजरातच्या संघाकडे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी कमी प्रमाणात आहे. तरीही विजयासाठी त्यांचा संघ प्रयत्न करील. याच कारणामुळे चेन्नईसाठी गुजरातचा पेपर सोपा नसेल.
दीपक चहर व मथिशा पथीराना हे वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. तसेच मुस्तफिजूर रहमान याने बांगलादेशचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली आहे. यामुळे चेन्नईला गोलंदाजी विभागात कमतरता जाणवत आहे. रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर व मोईन अली या फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीवर चेन्नईचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
तुषार देशपांडे हा मुंबईकर वेगवान गोलंदाजही छान कामगिरी करीत आहे. चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे सिमरजीत सिंग याची गोलंदाजी. त्याला पंजाबविरुद्धच्या लढतीत पहिल्यांदाच संधी देण्यात आली. सिमरजीत याने सातत्याने ताशी १४० किमी वेगाने चेंडू टाकत प्रभाव टाकला. तीन षटकांत त्याने दोन फलंदाजही बाद केले हे विशेष.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा शानदार फलंदाजी करीत आहे. त्याने एक शतक व चार अर्धशतकांसह ५४१ धावांचा पाऊस पाडला आहे. डॅरेल मिचेल (२२९ धावा) व शिवम दुबे (३५० धावा) यांच्याकडूनही धावा होत आहेत. शिवमला मागील दोन लढतींत सूर गवसला नाही; पण यामधून तो बाहेर येईल, याची शाश्वती संघ व्यवस्थापनाला आहे. अजिंक्य रहाणे व रवींद्र जडेजा या दोन्ही भारतीय फलंदाजांना सातत्यपूर्ण खेळ करावा लागणार आहे.
चेन्नईविरुद्धच्या लढतीत यजमान संघ म्हणून मैदानात उतरणाऱ्या गुजरातला मागील पाचपैकी चार लढतींमध्ये हार पत्करावी लागली आहे. या सुमार फॉर्ममुळे त्यांचा पाय खोलात गेला आहे. कर्णधार शुभमन गिल याला मागील पाच सामन्यांमध्ये निराशेचा सामना करावा लागला आहे. साई सुदर्शन, शाहरुख खान व डेव्हिड मिलर यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. गुजरातला फलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे.
मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत गुजरातचा गोलंदाजी विभाग तोकडा पडला आहे. मोहित शर्मा व जॉश लिटल यांच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पडत आहे. नूर अहमद व राशीद खान हे फिरकीपटू चमक दाखवण्यात अपयशी ठरत आहेत. गुजरातच्या गोलंदाजांसमोर उद्या होत असलेल्या लढतीत ऋतुराज गायकवाडला रोखण्याचे काम करावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.