मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज - कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामधील लढत मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. सलामीच्या लढतीत कोणता संघ बाजी मारतो, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दहा संघांमध्ये जेतेपदाची झुंज पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेल्या दहाही संघांनी लिलावाद्वारे खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत.
महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्जच्या नेतृत्वपदावरून माघार घेत रवींद्र जडेजाच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली. जडेजाकडे कर्णधारपद असले, तरी धोनीचे मार्गदर्शन संघाला लाभेल, यात शंका नाही. फाफ डुप्लेसी आता या संघामधून खेळणार नाही. डेव्होन कॉनवेकडे सलामी फलंदाजाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. ॠतुराज गायकवाड त्याच्यासोबतीला असेल. अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, रॉबीन उथप्पा यांच्यावर मधल्या फळीची मदार असणार आहे. चेन्नई सुपरकिंग्जला जडेजा, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, शिवम दुबे यांच्याकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
मोईन अली, दीपक चहरच्या अनुपस्थितीचा फटका
मोईन अलीला सलामीच्या लढतीत व्हिसाच्या अडथळ्यामुळे खेळता येणार नाही. मात्र दुसऱ्या लढतीपासून तो उपलब्ध होऊ शकणार नाही. पण कोट्यवधी रुपये खर्च करून संघात घेतलेला दीपक चहर मात्र दुखापतीमुळे आयपीएलच्या बहुतांशी लढतीमध्ये खेळू शकणार नाही. याचा फटका चेन्नई सुपरकिंग्जला बसू शकेल.
नवा कर्णधार
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व गेल्या मोसमात ओएन मॉर्गनकडे होते; यंदा मात्र या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. या संघात आंद्रे रस्सेल, सुनील नारायण व व्यंकटेश अय्यर वगळता सर्व खेळाडू नवे आहेत. अय्यरसह अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स, ॲलेक्स हेल्स, टीम साऊथी व उमेश यादव या अनुभवी खेळाडूंना संघासाठी मोलाची कामगिरी करावी लागणार आहे. ॲरोन फिंच व पॅट कमिन्स हे ऑस्ट्रेलियन खेळाडू पाकिस्तान दौऱ्यावर असल्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतींना ते मुकणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.