IPL 2023 Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals : समतोल संघ अशी ओळख असलेल्या राजस्थान रॉयल्सचा आज सलामीचा सामना हैदाबाद संघाशी होत आहे. गत स्पर्धेत केलेला कमालीचा खेळ यंदाही राजस्थानकडून अपेक्षित आहे.
राजस्थान रॉयल्सला गत स्पर्धेत विजेतेपद मिळाले नसले, तरी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यासाठी देण्यात येणारी ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेटसाठी मिळणारी पर्पल कॅप त्यांच्याकडेच होती. बटलर सर्वाधिक धावा करणारा; तर युझवेंद्र चहल सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. हे दोघेही खेळाडू यंदाही तशीच कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील. राजस्थान संघात युझवेंद्र चहलसह आर. अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा हुकमी लेगस्पिनर अॅडम झॅम्पा यांचा समावेश आहे, त्यामळे त्यांची फिरकीची बाजू सक्षम आहे.
राजस्थानचा कर्णधार बटलर व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये प्रामुख्याने टी-20 प्रकारात धोकादायक फलंदाज म्हणून ओळखला जातो. गत स्पर्धेत त्याने ८६३ धावा करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली होती. आता त्याच्या साथीला त्याचा इंग्लंड संघातील सहकारी ज्यो रूट असणार आहे, त्याशिवाय कर्णधार संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर आणि जेसन होल्डर अशी ताकदवान फलंदाजी राजस्थानची आहे. भारतीय खेळाडूंपैकी यशस्वी जयस्वालकडेही स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता आहे.
हैदराबादचा संघ तळ्यात मळ्यात अशा चक्रव्यूहात सापडलेला आहे. २०२१ च्या स्पर्धेत सर्वांत शेवटचे म्हणजे आठव्या आणि २०२२ मधील स्पर्धेत १० संघांत आठव्या स्थानापर्यंत त्यांची घसरण झाली होती. त्यामुळे त्यांनी कर्णधार राहिलेल्या केन विल्यम्सनलाही संघात कायम राखले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करमकडे नेतृत्वाची धुरा दिली खरी, परंतु तो सध्या राष्ट्रीय जबाबदारी सांभाळत असल्यामुळे उद्याच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार नेतृत्व करणार आहे.
मयांक अगरवाल इराणी करंडक सामन्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन फिलिप्सवर जबाबदारी वाढणार आहे. हैदराबाद संघाची ताकद गोलंदाजीत आहे. भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, दक्षिण अफ्रिकेचा मार्को यान्सेन हे प्रमुख गोलंदाज असतील, परंतु भुवनेश्वर कुमारला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. भारतीय संघातून वगळल्यानंतर भुवनेश्वर दुर्लक्षित राहिला आहे.
आजचा सामना
राजस्थान वि. हैदराबाद
ठिकाण ः हैदराबाद | वेळ ः दुपारी ३.३० पासून | थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.