सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) चा जलदगती गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हैदराबादच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामना नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मायकल वॉनने (Michael Vaughan) बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
वॉनने टी नटराजन कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यानंतर एक ट्विट करुन बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. मँचेस्टर कसोटी प्रमाणे आयपीएल सामना रद्द होतो का पाहूया. मला खात्री आहे की, सामना रद्द होणार नाही. अशा आशयाचे ट्विट मायकल वॉनने केले आहे.
आयपीएलपूर्वी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीपूर्वी भारतीय ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. भारतीय संघासोबत असणारे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड याच्यातील कसोटी सामना रद्द करण्याची वेळ आली होती.
बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने चर्चा करुन हा निर्णय घेतला असला तरी यासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या होत्या. भारतीय संघातील खेळाडू आयपीएल स्पर्धेला अधिक प्राधान्य देत असल्याची टीका इंग्लंडच्या काही माजी खेळाडूंनी केली होती. हाच मुद्दा पुन्हा उचलून धरत मायकल वॉनने बीसीसीआयला टोला लगावला आहे.
नटराजनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंर स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंसह सर्वांची पीसीआर चाचणी घेण्यात आली. या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. नटराजन याच्या संपर्कात आलेल्यांमध्ये कोणत्याही खेळाडूचा समावेश नाही. विजय कुमार (टीम मॅनेजर), श्याम सुंदर (फिजियोथेरेपिस्ट), अंजना वैनन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक्स मॅनेजर) आणि पेरियासॅमी गणेशन (नेट गोलंदाज) ही मंडळी नटराजनच्या संपर्कात होती. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. नटराजनला 10 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यानंतर दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला पुन्हा संघात सामील करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.