IPL 2023 Final CSK vs GT Analysis : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह चेन्नईने सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. दोन्ही संघांनी पाच वेळा हे विजेतेपद पटकावले आहे.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने चेन्नईसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना चेन्नईचा संघ केवळ तीन चेंडू खेळला. यानंतर मुसळधार पाऊस आला आणि सामना रात्री 12 वाजता सुरू झाला तेव्हा चेन्नईसमोर 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य होते. चेन्नई संघाने शेवटच्या चेंडूवर पाच गडी गमावून लक्ष्य गाठले आणि पाचवा कप जिंकला.
आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक झाल्यानंतर तो म्हणाला होता, आम्ही वातावरणाचा अंदाज घेऊन नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी ही जास्त काळ झाकून ठेववण्यात आली आहे. सामना संपल्यानंतर धोनीचा मास्टरप्लॅन कुठेतरी यशस्वी ठरल्या दिसला कारण चेन्नईला पावसाचा फायदा झाला.
चेन्नईचा युवा गोलंदाज अपयशी
धोनीच्या नेतृत्वाखाली तरुण गोलंदाजांनी संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली. स्पर्धेच्या सुरुवातीला धोनी म्हणाला होता की, संघाचे गोलंदाज सुधारले नाहीत तर चेन्नईला नव्या कर्णधारासोबत खेळावे लागेल. यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. मात्र, या युवा गोलंदाजांना अंतिम सामन्याचे दडपण सांभाळता आले नाही. चेन्नईसाठी यंदाच्या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा तुषार देशपांडे संपूर्ण सामन्यात विकेट्ससाठी तडफडत होता. त्याने चार षटकांत 56 धावा दिल्या.
चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट प्रति षटक नऊ पेक्षा जास्त होता. पाथीराना आणि देशपांडे यांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. डेथ ओव्हर्समध्ये पाथिरानाने तगडी गोलंदाजी करणे अपेक्षित होते, परंतु या सामन्यात त्याला तसे करता आले नाही आणि त्याने जबरदस्त धावा लुटल्या. या कारणामुळे गुजरातची धावसंख्या 200 धावांच्या पुढे गेली.
चेन्नईला पावसाचा फायदा
चेन्नई सुपर किंग्ज संघाला पावसाचा फायदा झाला. पावसामुळे षटके कमी झाली आणि चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले. पाच षटके कमी झाली, पण धावगती फारशी वाढली नाही. चेन्नईच्या हातात पूर्ण 10 विकेट होत्या. अशा स्थितीत कॉनवे आणि ऋतुराज यांनी तुफानी सुरुवात केली. या दोघांनी मिळून चार षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 52 धावा जोडल्या.
नूरने सामन्यात गुजरातला परत आणले...!
171 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने सहा षटकांत एकही विकेट न गमावता 72 धावा केल्या होत्या आणि ते चांगल्या स्थितीत होते. यानंतर नूरने दोन्ही सेट फलंदाजांना एकाच षटकात बाद केले. त्याने पहिल्या दोन षटकात फक्त 12 धावा देऊन गुजरातला सामन्यात आणले. ऋतुराज आणि कॉनवे बाद झाल्यानंतर दोन नवीन फलंदाजांसह चेन्नईची धावसंख्या 78/2 अशी होती. अशा स्थितीत चेन्नईचा संघ अडचणीत आला.
रहाणे-रायडूने केले सामन्यात पुनरागमन
या सामन्यात चौथ्या षटकात अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला. त्याने पहिल्या चार चेंडूंत दोन षटकार मारून आवश्यक धावगती फारशी वाढू दिली नाही. पुढचे षटक नूरचे होते ते काळजीपूर्वक खेळले. यानंतर रशीदच्या षटकात दोन चौकार मारत त्याने चेन्नईची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. सुरुवातीच्या 11 चेंडूत 26 धावा करत त्याने चेन्नई संघाला सामन्यात परत आणले.
मोहित शर्माने त्याला बाद केले, पण त्यानंतर दुबेने लय पकडली आणि रशीदच्या स्पेलच्या शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारत चेन्नईला सामन्यात रोखले.
त्याचवेळी रायुडूने आठ चेंडूंत 19 धावांची झंझावाती खेळी करत चेन्नईची स्थिती आणखी चांगली केली. रायुडूच्या खेळीचा परिणाम असा झाला की, सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स गमावल्यानंतरही चेन्नईचा संघ सामन्यात कायम राहिला.
शेवटच्या षटकात जडेजाची कामगिरी...!
मोहित शर्माने शानदार गोलंदाजी करत चेन्नई संघाला दडपणाखाली आणले होते. शेवटच्या षटकात 13 धावांचा बचाव करताना त्याने पहिल्या चार चेंडूत फक्त तीन धावा दिल्या. यानंतर रवींद्र जडेजाने षटकार आणि चौकार मारून चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.