आयपीएल 2024 स्पर्धेत 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने 7 विकेट्सने विजय मिळवला.
चेन्नईचा हा 10 सामन्यांतील 5 वा पराभव आहे. तसेच पंजाब किंग्सचा हा चौथा विजय ठरला आहे. खरंतर चेपॉक स्टेडियम चेन्नईचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु, यंदाच्या हंगामात त्यांना या स्टेडियमवर दुसरा पराभव स्विकारावा लागला आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 162 धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी पंजाबसमोर 163 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला.
तीन विकेट्स गमावल्यानंतर पंजाबचा डाव शशांक सिंग आणि कर्णधार सॅम करन यांनी सांभाळला. त्यांनी 18 व्या षटकात चेन्नईने दिलेले 163 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. शशांक 26 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या आणि सॅम करनने 20 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.
बेअरस्टो बाद झाल्यानंतरही रिली रुसोने पंजाबकडून आक्रमक खेळ केला होता. पण अखेर त्याला 11 व्या षटकात शार्दुल ठाकूरने त्रिफळाचीत केले. त्यामुळे रुसो 23 चेंडूत 43 धावा करून बाद झाला.
आयपीएलच्या 17व्या हंगामात शिवम दुबेला पहिल्यांचा या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. त्याच्याकडे चेन्नईचा कर्णधार ऋतुराजने 9 व्या षटकात चेंडू सोपवला. यावेळी त्याने या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर धोकादायक जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टोचा झेल यष्टीरक्षक एमएस धोनीने घेतला. बेअरस्टोने 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली.
चेन्नईने दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि जॉनी बेअरस्टो सलामीला फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी चांगली सुरुवातही केली होती. पण त्यांची जोडी या सामन्यातून चेन्नईसाठी पदार्पण करणाऱ्या रिचर्ज ग्लिसनने चौथ्या षटकात तोडली. त्याने प्रभसिमरनला 13 धावांवर माघारी धाडले. ऋतुराजने त्याचा झेल घेतला.
शेवटचे षटकही आर्शदीप सिंगने शानदार टाकले. त्यामुळे या षटकात धोनी फलंदाजीला असतानाही 13 धावा निघाल्या. विशेष म्हणजे धोनी या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर धावबाद झाला.
त्यामुळे यंदाच्या हंगामात धोनी बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. धोनीने 11 चेंडूत 14 धावा केल्या. दरम्यान चेन्नईला 20 षटकात 7 बाद 162 धावा करता आल्या. त्यामुळे आता पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य असेल.
पंजाबसाठी राहुल चाहर आणि हरप्रीत ब्रारने शानदार गोलंदाजी केली. चाहरने चार षटकात 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या, तसेच हरप्रीतने चार षटकात 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
ऋतुराजपाठोपाठ मोईल अलीला 19 व्या षटकात राहुल चाहरने 15 धावांवर त्रिफळाचीत केले.
चेन्नईसाठी झुंझार अर्धशतक केल्यानंतरही ऋतुराज चांगल्या लयीत खेळत होता. परंतु, 18 व्या षटकात आर्शदीप सिंगने ऋतुराजला त्रिफळाचीत केले. ऋतुराजने 48 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले.
एकीकडून सातत्याने विकेट्स जात असले, तरी दुसऱ्या बाजूने चेन्नईचा डाव भक्कमपणे ऋतुराज गायकवाडने सांभाळला. त्याने ऋतुराजने 17 व्या षटकात षटकार ठोकत 44 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
यासह त्याने आता आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सध्या आयपीएलच्या 17व्या हंगामात 500 पेक्षा अधिक धावा केवळ ऋतुराज आणि विराटने केल्या आहेत.
मधल्या षटकांमध्ये तीन मोठे धक्के बसल्यानंतर चेन्नईचा डाव कर्णधार ऋतुराजने इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवीच्या मदतीने सावरला होता. मात्र, त्यांची जोडी कागिसो रबाडाने तोडली. रबाडाने रिझवीला 21 धावांवर बाद केले. रिझवीचा झेल हर्षल पटेलने घेतला. त्याच्या रुपात चेन्नईला चौथा धक्का बसला.
चांगल्या सुरुवातीनंतर चेन्नई संघ संकटात सापडला आहे. 9 व्या षटकात रहाणे आणि शिवम दुबेची विकेट गमावल्यानंतर 9 व्या षटकात राहुल चाहरने रविंद्र जडेजालाही पायचीत पकडले. त्यानेही रिव्ह्युची मागणी केली, परंतु तोही त्यात बाद झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जडेजाला 2 धावांवर माघारी परतावे लागले.
पहिल्या 8 षटकात एकही विकेट न गमावलेल्या चेन्नईला 9 व्या षटकात हरप्रीत ब्रारने दुहेरी धक्का दिला. त्याने या षटकात टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणे रिली रुसौकडे झेल देत 29 धावांवर बाद झाला.
त्याच्यापाठोपाठ पुढच्याच चेंडूवर शिवम दुबे पायचीत झाला. त्याने लगेचच रिव्ह्यूची मागणी केली, मात्र रिव्ह्युमध्येही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दुबेला पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद व्हावे लागले.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंगसकडून अजिंक्य रहाणे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने डावाची सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीला सांभाळून खेळल्यानंतर मात्र आक्रमक शॉट्स खेळले. त्यामुळे त्यांनी 8 षटकात बिनबाद 64 धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्स - अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, रिचर्ड ग्लिसन, मुस्तफिजुर रहमान.
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - समीर रिझवी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोलंकी
पंजाब किंग्स - जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिली रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया
आयपीएल 2024 स्पर्धेत 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. परंतु चेन्नई संघात दोन मोठे बदल झाले आहेत. मथिशा पाथिरानाला छोटी दुखापत आहे, तसेच तुषार देशपांडे आजारी आहे. त्यामुळे हे दोघेही या सामन्यात खेळणार नाहीत. त्याचमुळे शार्दुल ठाकूरचे पुनरागमन झाले आहे, तर रिचर्ड ग्लिसन या सामन्यातून पदार्पण करत आहे.
Chennai Super Kings vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत बुधवारी (1 मे) 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
दरम्यान, चेन्नई आणि पंजाब या दोन्ही संघांचा हा आयपीएलच्या चालू हंगामातील प्रत्येकी 10 वा सामना आहे. चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 4 सामन्यांत पराभव स्विकारला आहे. तसेच पंजाबने 9 सामन्यांपैकी 3 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 6 सामन्यांत पराभव स्विकारला आहे.
तसेच आत्तापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्या आयपीएलच्या इतिहासात 28 सामने खेळवण्यात आले आहेत, यातील 15 सामन्यांत चेन्नईने विजय मिळवला आहे, तर 13 सामने पंजाबने जिंकले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.