आयपीएल 2024 स्पर्धेचा 52 वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बेंगळुरूने 4 विकेट्सने विजय मिळवला.
बेंगळुरूचा हा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा विजय, तर एकूण चौथा विजय ठरला. मात्र, गुजरातला 7 व्या पराभवाला समोरे जावे लागले आहे. त्याचमुळे आता त्यांच्यासमोरील संकटं वाढली आहेत. इतकेच नाही, तर या विजायसह बेंगळुरूने पाँइंट्स टेबलमध्येही मोठी झेप घेत सातवा क्रमांक मिळवला आहे. या सामन्यापूर्वी ते शेवटच्या क्रमांकावर होते.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला 19.3 षटकात सर्वबाद 147 धावाच करता आल्या. त्यामुळे आता विजयासाठी बेंगळुरूसमोर 148 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य बेंगळुरूने 13.4 षटकात 6 विकेटस गमावत 152 धावा करून पूर्ण केले.
मधल्या षटकांमधील पडझडीनंतर दिनेश कार्तिकने स्वप्निल सिंगला साथीला घेत डाव सावरत बेंगळुरूला विजयापर्यंत पोहचवले. बेंगळुरूने 147 धावांचे आव्हान 13.4 षटकात 152 धावा करत पूर्ण केले. कार्तिक 12 चेंडूत 21 धावांवर नाबाद राहिला, तर स्वप्निल 9 चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला.
गुजरातकडून गोलंदाजीत जोशुआ लिटिलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर नूर अहमदने 2 विकेट्सने घेतल्या.
जोशुआ लिटिलचा स्पेल संपल्यानंतर विराट आणि दिनेश कार्तिक विजय मिळवून देतील असे वाटत असतानाच विराटला नूर अहमदने बाद केले. विराट 27 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. त्यावेळी बेंगळुरूने 116 धावा केल्या होत्या. त्यामुळे अवघ्या बिनबाद 92 धावसंख्येनंतर अवघ्या 24 धावांत बेंगळुरूने 6 विकेट्स गमावल्या.
जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्याने 10 व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनलाही 1 धावेवर माघारी धाडले. त्यामुळे बिनबाद 92 वरून बेंगळुरूची अवस्था 5 बाद 111 धावा अशी झाली.
बेंगळुरूने सुरुवात शानदार केली होती. परंतु, पॉवरप्लेच्या 6 षटकांनंतर गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. विल जॅक्सनंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनाही 8 व्या षटकात जोशुआ लिटिलने बाद केले. पाटिदार 2 धावांवर आणि मॅक्सवेल 4 धावांवर बाद झाला. या दोघांचेही झेल डेव्हिड मिलरने घेतले.
अर्धशतकानंतर फाफ डू प्लेसिसला जोशुआ लिटीलने 6 व्या षटकात बाद केले. डू प्लेसिसने 23 चेंडूत 64 धावा केल्या. या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार त्याने मारले. त्यानंतर 7 व्या षटकात विल जॅक्सला नूर अहमदने अवघ्या 1 धावेवर बाद केले. डू प्लेसिस आणि विल जॅक्स या दोघांचाही झेल शाहरुख खानने घेतला.
गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बेंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोघांनीही सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्विकारला.
फाफ डू प्लेसिसने चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना 18 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. हे बेंगळुरूसाठी केलेलं दुसऱ्या क्रमांकाचं वेगवान अर्धशतक ठरले
तसेच विराट कोहलीनेही 10 वी धाव काढताना पुन्हा एकदा ऑरेंज कॅप मिळवली आहे. दोन दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाडने त्याच्यापेक्षा 9 जास्त धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. परंतु, आता पुन्हा एकदा विराट ऑरेंज कॅपचा मानकरी झाला आहे.
शेवटच्या षटकात मानव सुतारला पहिल्याच चेंडूवर विजयकुमार वैशाखने बाद केले. सुथारने 1 धाव केली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहित शर्मा धावबाद झाला. इतकेच नाही, तर तिसऱ्या चेंडूवर विजय शंकरनेही विकेट गमावली. त्याचा झेल 10 धावांवर मोहम्मद सिराजने घेतला. त्यामुळे 20 षटके पूर्ण होण्यापूर्वीच गुजरातचा डाव 147 धावांवर संपुष्टात आला.
या सामन्यात बेंगळुरूच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी सातत्याने विकेट्स घेत चिन्नास्वामीसारख्या छोट्या मैदानावर गुजरातला 150 धावांच्या आतच रोखले. बेंगळुरूकडून मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कॅमेरॉन ग्रीन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बेंगळुरूकडून 18 व्या षटकात यश दयाल गोलंदाजीसाठी आला होता. त्याने या षटकात तिसऱ्या चेंडूवर राशिद खानला 18 धावांवर त्रिफळाचीत केले, तर शेवटच्या चेंडूवर राहुल तेवतियाला 35 धावांवर बाद केले. तेवतियाचा अप्रतिम झेल विजयकुमार वैशाखने घेतला.
बेंगळुरूकडून 13 व्या षटकात विजयकुमार वैशाख गोलंदाजीला आला होता. त्याने टाकलेल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर राहुल तेवतियाने ऑफ-साईला फटका मारला, त्यावेळी नॉन-स्ट्रायकरला असलेल्या शाहरुख खानने त्याच्यासह चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु तेवतियाने त्याला नकार देत माघारी धाडले, त्याचवेळी विराटने नॉन-स्ट्रायकर एन्डच्या स्टंपवर चेंडू फेकला आणि बेल्स उडवल्या. त्यावेळी शाहरुख क्रिजमध्ये पोहचला नव्हता. त्यामुळे तो 24 चेंडूत 37 धावा करून माघारी परतला. यासह गुजरातने 5 विकेट्स गमावल्या.
सुरुवातीचे तीन विकेट्स 19 धावांतच गमावल्यानंतर गुजरातचा डाव डेव्हिड मिलर आणि शाहरुख खान यांनी सावरला होता. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला 80 धावांचा टप्पा गाठून दिला.
मात्र त्यांची जोडी 12 व्या षटकात कर्ण शर्माने तोडली. त्याने धोकादायक डेव्हिड मिलरला ग्लेन मॅक्सवेलच्या हातून झेलबाद केलं. मिलरने 20 चेंडूत 30 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया शाहरुख खानला साथ देण्यासाठी उतरला आहे.
गुजरातला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. सलामीवीर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला साई सुदर्शनही 6 धावांवर बाद झाला. त्याला कॅमेरॉन ग्रीनने सहाव्या षटकात विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले.
वृद्धिमान साहा बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात सिराजने गुजरातचा कर्णधार शुभमन गिललाही माघारी धाडले. गिलचा झेल या षटकात पाचव्या चेंडूवर विजयकुमार वैशाखने पकडला. त्यामुळे गिलला 2 धावांवर माघारी परतावे लागले.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलसह वृद्धिमान सहा सलामीला उतरला. मात्र दुसऱ्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजने सहाला 1 धावेवर माघारी धाडले. त्याचा झेल दिनेश कार्तिकने घेतला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार वैशाख
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - अनुज रावत, महिपाल लोमरोर, आकाश दीप, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई
गुजरात टायटन्स: वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), शुभमन गिल(कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुतार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल
इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - संदीप वॉरियर, शरद बीआर, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव
आयपीएल 2024 स्पर्धेचा 52 वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी बेंगळुरूने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केलेला नाही. तसेच गुजरातने मात्र दोन बदल केले आहेत. गुजरातने मानव सुतार आणि जोश लिटिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 52 वा सामना शनिवारी (4 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळवला जाणार आहे. बेंगळुरूचं घरचं मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होईल. या सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
दरम्यान, या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. दोन्ही संघांना या सामन्यात सातत्य टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.
तरी बेंगळुरूने त्यांच्या गेल्या दोन सामन्यांत विजय मिळवला आहे, त्यामुळे हीच लय कायम ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील, तर गुजरातला मात्र त्यांच्या गेल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे ते आता विजयी मार्गावर परतण्यासाठी उत्सुक असतील.
शनिवारी होणारा सामना दोन्ही संघांचा 17 व्या हंगामातील प्रत्येकी 11 वा साखळी सामना आहे. बेंगळुरूने आत्तापर्यंत झालेल्या 10 सामन्यांत 3 विजय मिळवले आहेत, तर 7 पराभव स्विकारले आहेत. तसेच गुजरातने 10 सामन्यांत 4 विजय मिळवले आहेत, तर 6 पराभव स्विकारले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.