कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना रिंकू सिंग व उमेश यादव हे खेळपट्टीवर फलंदाजी करीत होते.
अहमदाबाद - कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना रिंकू सिंग व उमेश यादव हे खेळपट्टीवर फलंदाजी करीत होते. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल हे षटक टाकत होता. उमेश यादवने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत रिंकूकडे फलंदाजी सोपवली. त्यानंतर रिंकूने पाचही चेंडूंवर षटकार खेचत कोलकाता नाईट रायडर्सला सनसनाटी विजय मिळवून दिला. कोलकाता नाईट रायडर्सचा हा दुसरा विजय ठरला. तर गुजरात टायटन्सला दोन विजयांनंतर पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या २१ चेंडूंमध्ये नाबाद ४८ धावा फटकावणारा रिंकू सामनावीर ठरला.
गुजरातकडून कोलकात्यासमोर २०५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. रहमानुल्लाह गुरबाज (१५ धावा) व नारायण जगदीशन (६ धावा) यांना अपयश आले. त्यानंतर व्यंकटेश अय्यर व कर्णधार नितीश राणा या जोडीने १०० धावांची भागीदारी करताना कोलकात्याच्या विजयाची आशा कायम ठेवली. अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर नितीश ४५ धावांवर बाद झाला. मात्र अय्यरने एका बाजूने आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली. त्याने ४० चेंडूंमध्ये ८ चौकार व ५ षटकारांसह ८३ धावांची फटकेबाजी केली. जोसेफच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला.
सुदर्शन, शंकरची अर्धशतके
साई सुदर्शन हा गुजरातचा मागील सामन्याचा हिरो होता. त्याने कोलकाताविरुद्धच्या लढतीतही चमक दाखवली. त्याने ३८ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने ३ चौकार व २ षटकार मारले. विजय शंकर याने २४ चेंडूंमध्ये ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ६३ धावा फटकावल्या. हार्दिक पंड्या आजारी असल्यामुळे राशीद खानकडे गुजरातचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. गुजरातने २० षटकांमध्ये ४ बाद २०४ धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक ः गुजरात टायटन्स २० षटकांत ४ बाद २०४ धावा (साई सुदर्शन ५३, विजय शंकर नाबाद ६३, सुनील नारायण ३/३३) पराभूत वि. कोलकाता नाईट रायडर्स २० षटकांत ७ बाद २०७ धावा (व्यंकटेश अय्यर ८३, नितीश राणा ४५, रिंकू सिंग नाबाद ४८, राशीद खान ३/३७, अल्झारी जोसेफ २/२७).
अखेरच्या षटकातील थरार
(गोलंदाज - यश दयाल, फलंदाज - रिंकू सिंग)
पहिला चेंडू - १ धाव (उमेश यादव)
दुसरा चेंडू - ६ धावा (रिंकू सिंग)
तिसरा चेंडू - ६ धावा (रिंकू सिंग
चौथा चेंडू - ६ धावा (रिंकू सिंग)
पाचवा चेंडू - ६ धावा (रिंकू सिंग)
सहावा चेंडू - ६ धावा (रिंकू सिंग)
राशीदची दमदार हॅट्ट्रिक
गुजरातचा कर्णधार राशीद खान गुजरातसाठी धावून आला. १७व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर त्याने कोलकात्याचे तीन फलंदाज बाद करीत हॅट्ट्रिकची नोंद केली. यामध्ये आंद्रे रस्सेल, सुनील नारायण व शार्दुल ठाकूर यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.