हैदराबाद : आयपीएल प्ले ऑफमध्ये आधीच पोहोचलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी झालेल्या अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत पंजाब किंग्स संघावर चार विकेट व पाच चेंडू राखून मात केली. हैदराबादचा हा मोसमातील आठवा विजय ठरला. पंजाबला नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले. अभिषेक शर्माच्या ६६ धावा हैदराबादच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरल्या.
पंजाबकडून हैदराबादसमोर २१५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. अर्शदीप सिंगने ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद करीत मोठा धक्का दिला. त्यानंतर अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी या जोडीने ७२ धावांची भागीदारी रचली. हर्षल पटेलने राहुलला ३३ धावांवर बाद केले. अभिषेक याने २८ चेंडूंमध्ये पाच चौकार व सहा षटकारांसह ६६ धावांची खेळी केली.
तो मोठी खेळी करील, असे वाटत असतानाच शशांक सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. नितीशकुमार व हेनरिक क्लासेन यांनी चमक दाखवली. हर्षल पुन्हा पंजाबसाठी धावून आला. त्याने नितीशकुमारला ३७ धावांवर बाद केले. हेनरिकने २६ चेंडूंमध्ये ४२ धावा फटकावल्या. हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
याआधी अथर्व तायडे (४६ धावा), प्रभसिमरन सिंग (७१ धावा) या जोडीने सलामीलाच ९७ धावांची भागीदारी करताना पंजाबला जबरदस्त सुरुवात करून दिली. प्रभसिमरन याने सात चौकार व चार षटकारांसह खेळी सजवली. संक्षिप्त धावफलक ः पंजाब किंग्स - २० षटकांत पाच बाद २१४ धावा (अथर्व तायडे ४६, प्रभसिमरन सिंग ७१, रायली रुसो ४९) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद - १९.१ षटकांत सहा बाद २१५ धावा (अभिषेक शर्मा ६६, हेनरिक क्लासेन ४२, अर्शदीप सिंग २/३७).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.