Rohit Sharma Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 67 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात खेळवला जाणार आहे. शुक्रवारी होत असलेला हा सामना मुंबईचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
दरम्यान, हा मुंबईचा आयपीएल 2024 स्पर्धेतील अखेरचा सामना आहे. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबई शुक्रवारी शेवटचा सामना खेळेल.
याचदरम्यान सध्या सोशल मीडियावर अशीही चर्चा सुरू झाली आहे की कदाचीत हा रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना असू शकतो. अनेक युजर्सने याबद्दलचे अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत.
खरंतर आयपीएल 2024 स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच रोहित मुंबईकडून यंदा अखेरचा हंगाम खेळत असल्याच्या चर्चा होत आहेत. मुंबई इंडियन्सने हा हंगाम सुरु होण्यापूर्वी रोहितला कर्णधारपदावरून हटवत हार्दिककडे नेतृत्वाची धूरा सोपवली होती. या निर्णयानंतरच या चर्चांना सुरुवात झाली. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली होती.
इतकेच नाही, तर अनेक रिपोर्ट असेही समोर आले की मुंबई इंडियन्सच्या संघात सर्वकाही आलबेल नाही. त्यांचा संघ दोन गटात विभागला गेल्याचेही म्हटले गेले. याबाबत काही माजी क्रिकेटपटूंनीही भाष्य केले होते.
तसेच रोहितचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यात तो मुंबईचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरला 'हे माझे शेवटचे आहे', असं सांगताना दिसला होता.
मात्र, या व्हिडिओमध्ये तो मुंबई इंडियन्सबद्दलच बोलत होता की नाही, याबद्दल मात्र स्पष्ट माहिती मिळालेली नाही. परंतु, त्याच्या बोलण्यावरून अनेक युजर्सने असा कयास लावला होता की तो मुंबई इंडियन्सबद्दल बोलत आहे.
रोहित पुढीलवर्षी कोलकाता संघात जाऊ शकतो, अशीही चर्चा होती. त्यामुळे आता मुंबई रोहितला करारमुक्त करणार का? रोहित लिलावात उतरणार का की मुंबईकडून खेळत राहणार, या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळणार आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना आत्तापर्यंत 13 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 9 सामने पराभूत झाले आहेत. मुंबई पाँइंट्स टेबलमध्येही सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत.
मुंबईने आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यापूर्वी हार्दिकला गुजरात टायटन्स संघातून ट्रेडिंगमधून संघात घेतले होते. हार्दिक यापूर्वी 2015 ते 2021 दरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.
त्यानंतर मुंबईने त्याला करारमुक्त केल्यानंतर तो 2022 आणि 2023 हंगाम गुजरात टायटन्स संघाकडून खेळला. या संघाचे नेतृत्व करताना त्याने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते, तर २०२३ मध्ये गुजरातला उपविजेकेपद मिळाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.