IPL 2024 KKR Vs PBKS Playing 11 : कोलकता नाईट रायडर्स-पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज (ता. २६) आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. एकीकडे पाच विजयांसह प्ले ऑफच्या दिशेने जात असलेला कोलकता संघ, तर दुसरीकडे अवघ्या दोन विजयांवर समाधान मानावा लागलेला पंजाबचा संघ एकमेकांसमोर उभा ठाकणार आहे.
पंजाबचा संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरेल. कोलकताचा संघ मात्र गोलंदाजी विभागात कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करील. २४.७५ कोटींची बोली लावत कोलकता संघात समाविष्ट केलेल्या मिचेल स्टार्कला अद्याप तरी प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याच्यावरील दबाव वाढला असून अव्वल दर्जाची कामगिरी करण्यासाठी त्याला अथक परिश्रम करावे लागणार आहेत.
कोलकता संघाने सात सामन्यांमधून पाच सामन्यांत विजय मिळवत प्ले ऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. सुनील नारायणचा धडाकेबाज अष्टपैलू खेळ (२८६ धावा व ९ विकेट) हा कोलकत्याच्या वाटचालीत महत्त्वाचा ठरला आहे.
फिल सॉल्ट (२४९ धावा), श्रेयस अय्यर (१९० धावा), आंद्रे रसेल (१५५ धावा) हे फलंदाजही छान खेळ करीत आहेत. रिंकू सिंग याने फक्त ६७ चेंडूंचा सामना केला आहे. तरीही त्याने या दरम्यान १५९.७० च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. श्रेयस अय्यर वगळता कोलकता संघातील इतर फलंदाजांनी दीडशेपेक्षा जास्त सरासरीने धावा केलेल्या आहेत. व्यंकटेश अय्यरला अद्याप सूर गवसलेला नाही.
कोलकता संघाला गोलंदाजीत मेहनत घ्यावी लागणार आहे. सुनील नारायण व वरुण चक्रवर्ती यांचा अपवाद वगळता इतर गोलंदाजांकडून म्हणावी तशी चमकदार कामगिरी झालेली नाही. हर्षित राणा व वैभव अरोरा यांनी अनुक्रमे ९ व ७ फलंदाज बाद केले आहेत. पण दोघांच्या गोलंदाजीवर नऊपेक्षा जास्त सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवरही आक्रमण करण्यात आले आहे, पण त्याने निर्णायक क्षणी फलंदाज बाद करीत आपली चुणूक दाखवली आहे.
फॉर्ममध्ये येण्यासाठी धडपड
पंजाबचा संघ सपशेल अपयशी ठरत आहे. प्रभसिमरन सिंग (१५४ धावा), लियाम लिव्हिंगस्टोन (१११ धावा), जॉनी बेअरस्टो (९६ धावा) व रायली रुसो (१० धावा) या फलंदाजांना सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागत आहे. शशांक सिंग (१९५ धावा) व आशुतोष शर्मा (१५९ धावा) या युवा खेळाडूंनी चमक दाखवली आहे, पण अखेरचा विजयी पंच देण्यात त्यांना यश मिळालेले नाही. पंजाबच्या संघाने आठ सामन्यांमधून फक्त दोनच सामन्यांत विजय मिळवलेले आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांचा पाय खोलात आहे.
स्टार गोलंदाज; पण अपयशी
पंजाबकडे कागिसो रबाडा, सॅम करन, हर्षल पटेल व अर्शदीप सिंग या चार स्टार वेगवान गोलंदाजांची चौकडी आहे. रबाडाने १०, करनने ११, हर्षलने १३ व अर्शदीपने १० विकेट मिळवल्या आहेत. मात्र या चारही गोलंदाजांना पंजाबला सातत्याने विजय मिळवून देता आलेले नाहीत. हरप्रीत ब्रार, राहुल चहर व लियाम लिव्हिंगस्टोन या फिरकी गोलंदाजांनाही अपयशाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या उत्तरार्धात धमक दाखवण्यासाठी पंजाबचे गोलंदाज जीवाचे रान करताना दिसतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.