मुंबई : पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून पराभव पत्करावा लागलेल्या मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी वानखेडे या घरच्या मैदानावरही कायम राहिली. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने शनिवारी येथे झालेल्या आयपीएल लढतीत मुंबई इंडियन्सवर ७ विकेट व ११ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.
हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला. मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर यांची प्रभावी गोलंदाजी आणि अजिंक्य रहाणे, ॠतुराज गायकवाड यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्सने विजयाला गवसणी घातली.
मुंबईकडून चेन्नईसमोर १५८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. वानखेडे स्टेडियमसारख्या फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर हे माफक आव्हान होते. पण मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने डेव्होन कॉनवेला शून्यावर बाद करीत चांगली सुरुवात केली. त्यानंतर ॠतुराज गायकवाड व अजिंक्य रहाणे या जोडीने चेन्नईसाठी मोलाची कामगिरी केली. अजिंक्यने मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली.
त्याने २७ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची फटकेबाजी केली. या मोसमातील वेगवान अर्धशतक त्याने झळकावले. पीयूष चावलाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर ॠतुराज (नाबाद ४० धावा) व अंबाती रायुडू (नाबाद २० धावा) यांनी चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, याआधी चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. रोहीत शर्मा व इशान किशन या जोडीने ३८ धावांची भागीदारी करीत आश्वासक सुरुवात केली. पण तुषार देशपांडेने अफलातून चेंडूवर रोहितचा २१ धावांवर त्रिफळा उडवला.
त्यानंतर जडेजाने ३२ धावांवर खेळणाऱ्या इशानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवचा सुमार फॉर्म कायम राहिला. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक धोनीकरवी झेलबाद झाला. त्याला एकच धाव करता आली. मैदानातील पंचांकडून सूर्यकुमारला बाद देण्यात आले नव्हते.
पण धोनीने रिव्हूय घेतला. त्यानंतर चेंडू सूर्यकुमारच्या बॅटला लागून धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला असल्याचे रिप्लेमध्ये दिसले. अखेर सूर्यकुमार बाद झाला. यानंतर तिलक वर्मा (२२ धावा), टीम डेव्हिड (३१ धावा) व हृतिक शोकीन (नाबाद १८ धावा) यांनी मुंबईच्या धावसंख्येत भर घातली. चेन्नईकडून जडेजाने ३, तर सँटनरने २ फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई इंडियन्स २० षटकांत ८ बाद १५७ धावा (रोहित शर्मा २१, इशान किशन ३२, तिलक वर्मा २२, टीम डेव्हिड ३१, रवींद्र जडेजा ३/२०, मिचेल सँटनर २/२८, तुषार देशपांडे २/३१) पराभूत वि. चेन्नई सुपरकिंग्स १८.१ षटकांत ३ बाद १५९ धावा (ॠतुराज गायकवाड नाबाद ४०, अजिंक्य रहाणे ६१, शिवम दुबे २८).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.