Mumbai Indians Vs Delhi Capitals IPL 2024  esakal
IPL

MI vs DC IPL 2024 : मुंबईला प्रतीक्षा विजयाच्या सूर्योदयाची! दिल्लीविरूद्ध स्काय येणार का पल्टनच्या कामाला?

अनिरुद्ध संकपाळ

Mumbai Indians Vs Delhi Capitals IPL 2024 : आयपीएलच्या गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर हेलखावे खाणाऱ्या पाच वेळच्या विजेता मुंबई इंडियन्सला प्रतीक्षा आहे पहिल्या विजयाची. ट्वेन्टी-२० प्रकारात जगात अव्वल स्थानावर असलेला सूर्यकुमार संघात परतला आहे. त्यामुळे उद्या घरच्या मैदानावर मुंबईचा संघ विजयाचा सूर्योदय होण्याची वाट पाहत आहे.

वानखेडे स्टेडियमवर उद्या दुपारी होणारा हा सामना नवव्या आणि दहाव्या स्थानावर असलेल्या अनुक्रमे दिल्ली आणि मुंबई यांच्यात होणार आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने गतविजेत्या आणि मुंबईप्रमाणेच पाच वेळा अजिंक्यपद मिळवलेल्या चेन्नईला धक्का दिला; पण त्यांनीही तीन सामने गमावले आहेत. एकूणच हे दोन्ही संघ अस्तित्वाची नवी लढाई लढणार आहेत.

मुंबईचा संघ म्हणजे एकापेक्षा एक नावाजलेल्या खेळाडूंचा संघ; पण मैदानावरील कामगिरी मात्र पूर्ण अपेक्षाभंग केलेला आहे. कधी गोलंदाजांनी साफ निराशा केली तर कधी फलंदाजांनी शरणागती स्वीकारली; पण या तिन्ही पराभवांत सूर्यकुमार संघात नव्हता.

अगोदर गुडघ्यावरील शस्त्रक्रिया त्यानंतर स्पोर्ट्‌स हार्निया यामुळे तीन महिने क्रिकेटपासून दूर असलेला सूर्यकुमार यादव पहिल्या चेंडूपासून आक्रमण करू शकेल, अशी त्याची क्षमता आहे; परंतु प्रदीर्घ कालावधीनंतर खेळत असल्यामुळे त्याचा पवित्रा सावधही असू शकेल; परिणामी सूर्यकुमार संघात परतला असला तरी रोहित शर्मापासून हार्दिक पंड्यापर्यंत प्रत्येकाला मोठे योगदाने द्यावे लागणार आहे.

मुळात कर्णधार बदलावरून मुंबई संघाभोवतीचे वातावरण बिघडलेले आहे. गुजरात संघाला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठून देणारा हार्दिक पंड्या तीच लय मुंबई इंडियन्स संघाचा प्रथमच कर्णधार झाल्यावर कायम राखू शकला नाही, त्यामुळे एकीकडे चाहत्यांचा विरोध सहन करत असताना दुसरीकडे कामगिरी उंचावण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. कर्णधारपदाबरोबर फलंदाज आणि गोलंदाज म्हणूनही तो अपयशी ठरत आहे.

रोहितचीही प्रतिष्ठा पणास

हार्दिकला विरोध आणि रोहितला समर्थन असा खेळ मुंबई संघाच्या पाठीराख्यांमध्ये सुरू आहे. राजस्थानविरुद्धच्या गेल्या सामन्यात रोहित पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता, त्यामुळे आता त्याचीही प्रतिष्ठा पणास लागणार आहे. ईशान किशन, टीम डेव्हिड यांना केवळ चांगली सुरुवात करून नव्हे तर मोठी खेळी करून संघाच्या विजयात हातभार लावावा लागणार आहे.

सूमार गोलंदाजी ही दोन्ही संघांची दुखरी बाजू राहिलेली आहे. दोन्ही संघांनी २७० पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत. हैदराबादने मुंबईची तर कोलकताने दिल्लीची गोलंदाजी फोडून काढलेली आहे. या धक्यातून मुंबईचा संघ राजस्थानविरुद्ध काही प्रमाणात सावरला; पण दिल्लीचा संघ त्या मानसिकतेनंतर लगेचच मुंबईविरुद्ध खेळणार आहे. या संधीचा फायदा मुंबईचे गोलंदाज कसा घेतात हे महत्त्वाचे आहे.

रिषभ पंतवर लक्ष

दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने कोलकताविरुद्ध अफलातून फलंदाजी केली होती, तंदुरुस्त होऊन क्रिकेटच्या मैदानावर परतल्यावर प्रत्येक सामन्यातून तो प्रगती करत आहे. त्यामुळे त्याचा धोका मुंबईच्या गोलंदाजासमोर असणार आहेच. मात्र, मुंबईकडे बुमरा हे अस्र आहे. त्यामुळे पंत विरुद्ध बुमरा ही लढाई कशी रंगते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मिचेल मार्श दुखापतीमुळे उद्याच्या सामन्यात खेळणार आहे; परंतु दिल्लीकडे डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ असे धडाकेबाज फलंदाज आहेत. पृथ्वी तर घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे त्याची बॅट तळपू शकेल.

दुपारचा सामना

वानखेडे स्टेडियमवर उद्या होणारा हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे चेंडू अधिक स्वींग होण्याची शक्यता तेवढी नसेल. राजस्थानविरुद्धचा सामना सायंकाळी ७.३० वाजता सुरू झाला होता आणि त्यांचा स्वींग गोलंदाज ट्रेंट बोल्डने मुंबईचे पहिले तीन फलंदाज शून्यावर बाद करून मुंबईला बॅकफूटवर टाकले ते अखेपर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT