कोलकता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करीत आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. अंतिम चारमध्ये पोहोचणारा तो पहिलाच संघ ठरला. याप्रसंगी दुखापतीमधून बरा होत संघात पुनरागमन करणारा कोलकता संघाचा उपकर्णधार नितीश राणा याने रहस्य उलगडताना म्हटले की, यश-अपयशात आमच्या संघात एकजुटता कायम राहते. टप्प्याटप्प्यावर आम्ही एकमेकांना साह्य करतो. सांघिक कामगिरी हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.
कोलकता संघ २०२१ नंतर पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये पोहोचला आहे. नितीश राणा या वेळी म्हणाला, आमच्या संघाने विजय मिळवला असो किंवा आमच्या संघाचा पराभव झालेला असो, आम्ही एकत्रच असतो. आमच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणही असेच आहे. मागील दोन वर्षांमध्ये आमच्या संघात याची कमतरता दिसून येत होती. नितीश याने मुंबईविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममधील एक बाब सर्वांसमोर आणली. तो म्हणाला, ‘‘पंजाबने आमच्याविरुद्ध विक्रमी धावसंख्येचा पाठलाग केला, तेव्हा संघातील तीन ते चारच खेळाडूंनी रात्रीचे जेवण केले. सर्वांना अतिशय वाईट वाटले होते.’’
२० ते २२ दिवस बॅटला हात लावला नाही
दुखापतीमुळे नितीश राणा आयपीएल लढतींना मुकला. अखेर शनिवारच्या लढतीत त्याने कोलकता संघामधून पुनरागमन केले. त्याने २३ चेंडूंमध्ये ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळीही केली. तो म्हणाला, दुखापतीमुळे मी २० ते २२ दिवस बॅटला हातही लावला नाही. हळूवारपणे मी दुखापतीमधून सावरलो. शुक्रवारच्या रात्री तर झोपच लागली नाही. पहाटे आठ वाजता झोप लागली. आयपीएलमधील पहिला सामना खेळत असल्याची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली, पण चांगली कामगिरी करण्याची भूक माझ्यामध्ये असल्यामुळे छान खेळी करता आली, असे तो पुढे आवर्जून नमूद करतो.
रमणदीपला दंड
मुंबई-कोलकता यांच्यामध्ये शनिवारी आयपीएल साखळी फेरीची लढत रंगली. या लढतीत कोलकता संघाचा गोलंदाज रमणदीप सिंग याच्याकडून आयपीएल नियमाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे त्याच्या सामना मानधनातून २० टक्के रक्कम कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.