गुवाहाटी: पंजाब किंग्सने बुधवारी गुवाहाटी येथे झालेल्या आयपीएल लढतीत राजस्थान रॉयल्सवर ५ धावांनी निसटता विजय मिळवला. पंजाब किंग्सचा हा सलग दुसरा विजय ठरला. गतवेळच्या उपविजेत्या राजस्थान रॉयल्सचा हा यंदाच्या मोसमातील पहिलाच पराभव होय.
कर्णधार शिखर धवन (नाबाद ८६ धावा), प्रभसिमरन सिंग (६० धावा) यांची धडाकेबाज फलंदाजी व नॅथन एलिसच्या (४/३०) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने हा विजय साकारला हे विशेष.
राजस्थान रॉयल्सच्या शिमरॉन हेटमायर (३६ धावा) व ध्रुव जुरेल (नाबाद ३२ धावा) यांनी अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करीत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही.
पंजाबकडून राजस्थानसमोर १९८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. राजस्थानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
कर्णधार संजू सॅमसन याने ४२ धावांची खेळी साकारली. पण त्याला खेळपट्टीवर उभे राहून राजस्थानला विजय मिळवून देता आला नाही. राजस्थानला २० षटकांत ७ बाद १९२ धावा करता आल्या.
दरम्यान, याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र पंजाबच्या सलामी फलंदाजांनी त्यांचा निर्णय योग्य नसल्याचे आक्रमक फलंदाजी करून दाखवून दिले. कर्णधार शिखर धवन व प्रभसिमरन सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली.
प्रभसिमरन याने शानदार फलंदाजी करताना ३४ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावांची खेळी साकारली. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर तो जॉस बटलरकरवी झेलबाद झाला आणि जोडी तुटली.
प्रभसिमरन बाद झाल्यानंतर धवनने खेळाची सुत्रे आपल्या हातामध्ये घेतली. त्याला म्हणावी तशी इतरांची साथ लाभली नाही. जितेश शर्माने २७ धावांची व शाहरुख खानने ११ धावांची खेळी केली. पण धवनने स्वबळावर पंजाबला २० षटकांत ४ बाद १९७ धावा फटकावून दिल्या.
धवनने ५६ चेंडूंमध्ये ९ नेत्रदीपक चौकार व ३ खणखणीत षटकारांसह नाबाद ८६ धावांची खेळी साकारली. राजस्थानकडून होल्डर याने २९ धावा देत २ फलंदाज बाद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.