RCB vs RR IPL 2024 Eliminator esakal
IPL

RR vs RCB : राजस्थानचा रॉयल कारभार! टप्प्यात आणून केला RCB चा कार्यक्रम

अनिरुद्ध संकपाळ

RCB vs RR IPL 2024 Eliminator : एलिमिनेटर सामना हा अशा दोन संघात होता ज्यांचा हंगामातील प्रवास फारच चढ-उतारांचा राहिला आहे. एकीकडं राजस्थान रॉयल्स होती जी लीग स्टेज सुरूवातीला अव्वल स्थानावर होती मात्र शेवटी त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. दुसरीकडं रॉयल चॅलेंजर बंगळुरू होती ज्या संघानं सलग सहा डू ऑर डाय मॅचेस जिंकत प्ले ऑफ गाठण्याचा इतिहास रचला होता.

राजस्थानचा शेवटचा लीग सामना पावसामुळं रद्द झाला अन् नेट रनरेटवर हैदराबादनं त्यांचं दुसरं स्थान हिसकावलं. जो संघ एक सामना खेळून थेट फायनल गाठण्याच्या लायकीचा होता त्या संघाला आता एलिमिनेटर मग क्वालिफायर 2 त्यानंतर फायनल गाठण्याचा संघर्ष करायचा होता.

राजस्थानसमोर सलग सहा मैदानं मारलेला संघ आरसीबी होता. सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असल्यानं टॉसला महत्व होतं. गेल्या सामन्यात हैदराबादला इथंच ठेच लागली होती. संजूनं मात्र कमिन्सचा कित्ता गिरवला नाही. त्यानं टॉस जिंकून बॉलिंग घेतली अन् शहाणपणा दाखवला. इथंच संजूनं अर्धी लढाई जिंकली होती.

मात्र आरसीबी 'विराट' संघर्ष करत प्ले ऑफमध्ये पोहचली होती. ती देखील सहजासहजी हार मानणारी नव्हती. राजस्थानच्या कसलेल्या गोलंदाजीसमोर पडझड होत असतानाही त्यांनी 172 धावांपर्यंत मजल मारलीच. यात पाटीदारनं 34 तर महिपाल लोमरोरनं 32 धावांचं योगदान दिलं. तिकडं राजस्थानकडून आवेश खाननं 3 विकेट्स घेत आरसीबीला चांगलंच खिंडार पाडलं होतं. अश्विननं दोन विकेट्स घेत बंगळुरूच्या फलंदाजांना शांत ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला.

आरसीबीनं जवळपास 20 रन्स कमी केल्या होत्या. मात्र त्यांनी त्याची कमी फिल्डिंगमध्ये भरून काढली. सलग दुसरा सामना होत असल्यानं मोदी स्टेडियमचं पिच संथ झालं होतं. त्यामुळं धावा करणं अवघड होतं. त्यामुळं राजस्थानची सुरूवात देखील अत्यंत सुमार झाली होती.

अखेर यशस्वीनं पॉवरच्या उत्तरार्धात आपला दांडपट्टा सुरू केला अन् राजस्थानला सहा ओव्हरमध्ये अर्धशतकी मजल मारून दिली. दुसऱ्या बाजूनं संजू सॅमसन त्याला सिंगल डबल रन्स घेत चांगली साथ देत होता. सामना राजस्थानच्या हातात होता. तेवढ्यात ग्रीननं 45 धावांवर यशस्वीची शिकार केली. पाठोपाठ कर्ण शर्मानं कर्णधार संजूला अलगद रस्त्यातून बाजूला काढलं.

आता आरसीबीला बळ आलं होतं. त्यांनी 11 ते 15 या पाच ओव्हरमध्ये राजस्थानच्या चांगल्याच नाड्या आवळल्या होत्या. रियान अन् ध्रुव जुरेलला धावा करणं मुश्किल झालं होतं. तरी रियान डगमगला नाही. ते निवांत सिंगल डबल धावा घेत होता. मात्र एक चोरटी धाव घेताना ध्रुव जुरेल गडबडला अन् विराटनं संधी साधली. जुरेल रन आऊट झाल्यावर वाटलं आरसीबीनं कमबॅक केलंय.

मात्र दुखापतीतून सावरत राजस्थानसाठी एलिमिनेटर सामन्यात खेळणारा हेटमायर मात्र वेगळ्याच मूडमध्ये होता. पराग अन् हेटमायरनं 15 षटकापर्यंत कोणतीही जोखीम घेतली नाही. वाटलं आरसीबी सामना जिंकते की काय मात्र 15 व्या षटकानंतर हेटमायरनं टोलेबाजी सुरू केली. रियान देखील संधी मिळाली की एक दोन ठेवून देत होता. या दोघांनी आरसीबाचा टप्प्यात आणून कार्यक्रम करण्याच चंगच बाधला होता.

सामना बॉल टू रन आला. राजस्थान विजयाच्या जल्लोषाची तयारी करत होता. तेवढ्यात 18 व्या षटकात मोहम्मद सिराजनं आधी रियानची दांडी गुल केली. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर हेटमायरची 26 धावांची खेळी संपवली. आता वाटलं सामन्यात ट्विस्ट आलाय. आरसीबीची सगळी मंडळी जल्लोष करत होती. विराट मात्र शांत होता.

जणू त्याला माहिती होतं की रोव्हमन पॉवेल नावाचा एक व्यक्ती या सर्वांच्या आनंदावर पाणी फिरवणार आहे. झालं तसंच! फर्ग्युसन टाकत असलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये पॉवेलनं दोन चौकार एक षटकार मारत आरसीबीचा विषयच संपवला! राजस्थाननं संयमी खेळ करत आरसीबीचं आव्हान 19 षटकात 4 बॅट्समन राखून पार केलं.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT