Rohit Sharma and Virat Kohli 
IPL

T20 World Cup 2024 : रोहित शर्मा -विराट कोहलीची प्रतिष्ठा पणाला; वर्ल्ड कप जिंकण्याची शेवटची संधी...

भारताच्या दोन महान खेळाडूंना विश्‍वविजेतेपदाचा मान मिळवण्याची अखेरची संधी असणार आहे.

Kiran Mahanavar

भारताच्या दोन महान खेळाडूंना विश्‍वविजेतेपदाचा मान मिळवण्याची अखेरची संधी असणार आहे. विराट कोहली व रोहित शर्मा हे दोनही दिग्गज वेस्ट इंडीज व अमेरिका येथे आपला अखेरचा टी-२० विश्‍वकरंडक खेळण्याची दाट शक्यता आहे. २०१३नंतर भारतीय संघ आयसीसी आयोजित स्पर्धांच्या जेतेपदापासून सातत्याने दूर राहिला आहे. विराट व रोहित यांना हा विजेतेपदाचा दुष्काळही संपवायचा असेल. त्यामुळे येत्या २ जूनपासून सुरू होणारी टी-२० विश्‍वकरंडक ही प्रतिष्ठेची स्पर्धा या दोघांसह भारतासाठीही अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७मध्ये टी-२० विश्‍वकरंडक जिंकण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर अद्याप टीम इंडियाला टी-२० विश्‍वकरंडकाच्या अजिंक्यपदाला गवसणी घालता आलेली नाही. या विश्‍वविजेत्या संघात रोहित शर्माचा समावेश होता. या संघात मात्र विराट कोहली नव्हता. त्यानंतर भारतीय संघाने २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्याच नेतृत्वात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. १९८३नंतर भारत विश्‍वविजेता बनला. या विश्‍वविजेत्या संघात विराट कोहली होता. या संघात रोहितचा समावेश नव्हता.

चॅम्पियन्स ट्रॉफीत दोघेही खेळले

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१३मध्ये इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन्स करंडकात विजेता होण्याचा मान संपादन केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडवर मात करीत भारताने विजेतेपदाचा करंडक उंचावला होता. या स्पर्धेत विराट व रोहित या दोनही खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताने या स्पर्धेनंतर आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारा एकही करंडक जिंकलेला नाही.

वय, फिटनेस अन्‌ स्ट्राईक रेटची मर्यादा

रोहित शर्माचे सध्याचे वय ३७ आहे. तसेच विराट कोहली ३५ वर्षांचा आहे. पुढचा टी-२० विश्‍वकरंडक २०२६मध्ये भारत व श्रीलंका येथे होणार आहे. त्यानंतर २०२७मध्ये दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. तोपर्यंत या दोनही खेळाडूंचे वय वाढणार आहे. त्यामुळे दोघांसमोरही वयाची मर्यादा असणार आहे. रोहितपेक्षा विराट तंदुरुस्त आहे; पण फलंदाजी स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका होऊ शकते, कारण टी-२० व एकदिवसीय या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी स्ट्राईक रेट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

युवा खेळाडू सरसावले

विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यापुढे युवा खेळाडूंचेही आव्हान असणार आहे. आयपीएलमुळे भारतात असंख्य युवा खेळाडू नावारूपाला येत आहेत. सध्या यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, इशान किशन हे खेळाडू सातत्याने संघात समावेश करीत आहेत. ऋतुराज गायकवाड, रियान पराग, अभिषेक शर्मा, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, जितेश शर्मा यांच्यासह इतर फलंदाजही शर्यतीत आहेत. त्यामुळे रोहित व विराट या दोघांवरही संघातील स्थान कायम राखण्यासाठी प्रचंड मोठा दबाव असणार आहे.

विराटविना सराव

भारतीय क्रिकेट संघाने बुधवारपासून टी-२० विश्‍वकरंडकाच्या तयारीला सुरुवात केली. या सरावाला विराट कोहलीची अनुपस्थिती होती. तो येत्या शुक्रवारी भारतीय संघाशी जोडला जाणार आहे. मात्र, शनिवारी होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव लढतीत तो खेळणार की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

मुख्य फेरी लक्षात ठेवून प्राधान्य

भारतातील सर्व क्रिकेटपटूंनी मागील दोन महिन्यांत आयपीएलमधील लढती खेळण्याचा अनुभव मिळवला. या स्पर्धेच्या लढती बहुतांशी रात्रीच्या वेळेत खेळवण्यात आल्या. मात्र, टी-२० विश्‍वकरंडकातील भारतीय संघाच्या लढती या सकाळच्या सत्रात असणार आहेत. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी पहिला सराव सकाळच्या सत्रात पार पडला. आर्द्रता कमी असलेल्या वातावरणात हे सत्र रंगले. या सत्रात वातावरण जुळवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय संघातील इतर खेळाडूंसह उपकर्णधार हार्दिक पंड्याचाही या सराव सत्रात सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: तेल्हाऱ्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई, रोख रक्कम आणि दोन मोबाईल जप्त

Nashik Vidhan Sabha Election 2024 : माझे वोट, माझी ताकद! पोलिस आयुक्तांचे मतदानाचे आवाहन

Ajit Pawar : विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका? वाचा काय म्हणाले अजित पवार

Sindhudurg Assembly Election 2024 : मतदानासाठी ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक

अर्ध्यावरती डाव मोडला! २९ वर्षांनी एन आर रहमान व सायरा बानू यांचा घटस्फोट, निवेदन जाहीर करत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT