Yashasvi Jaiswal - Sanju Samson | Rajasthan Royals | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024 RR vs MI : जैस्वालचं खणखणीत शतक अन् राजस्थानचा मुंबईवर दणदणीत विजय; पाँइंट्स टेबलमध्येही अव्वल स्थान कायम

RR vs MI Scorecard IPL 2024 : आयपीएल 2024 मधील 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दणदणीत विजय मिळवला.

Pranali Kodre

Rajasthan Royals vs Mumbai Indians Result: 

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 38 व्या सामन्यात सोमवारी राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध झाला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवलेल्या या सामन्यात राजस्थानने 9 विकेट्सने विजय मिळवला.

राजस्थानचा हा 17 व्या आयपीएल हंगामातील 8 सामन्यांतील 7 वा विजय आहे. तर मुंबईचा 9 सामन्यांतील 5 वा पराभव आहे. त्यामुळे राजस्थानने अव्वल क्रमांकावरील स्थान आणखी भक्कम केले आहे. तर मुंबई सातव्या क्रमांकावर आहे.

तसेच राजस्थानचा यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी राजस्थानने मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवरही विजय मिळवला होता.

या सामन्यात मुंबईने राजस्थानसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग राजस्थानने 18.4 षटकात 1 विकेट गमावत 183 धावा करून पूर्ण केला. राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली, तर मुंबईकडून एकमेव विकेट पीयुष चावलाने घेतली.

IPL 2024 RR vs MI Live Score : जैस्वालचं खणखणीत शतक अन् राजस्थानचा मुंबईवर दणदणीत विजय; पाँइंट्स टेबलमध्येही अव्वल स्थान कायम

जैस्वालने शतक पूर्ण केल्यानंतर 19 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार ठोकत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानने 180 धावांचे लक्ष्य अवघी एकच विकेट गमावत गाठले.

जैस्वाल 60 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 104 धावांवर नाबाद राहिला, तर संजू सॅमसनने 28 चेंडूत 38 धावांची नाबाद खेळी केली. जैस्वाल आणि सॅमसन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची नाबाद भागीदारी झाली.

IPL 2024 RR vs MI Live Score : जैस्वालचा मुंबईला शतकी दणका, चौकार-षटकारांची बरसात करत राजस्थानला आणलं विजयाच्या जवळ

जैयस्वालने अर्धशतकानंतर अधिकच आक्रमक खेळ करत शतक पूर्ण केले. त्याने 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 8 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 59 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्याचे हे आयपीएलमधील दुसरे शतक आहे. त्याला बटलर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने दमदार साथ देत शतकी भागीदारी केली.

IPL 2024 RR vs MI Live Score : बटलर बाद झाला, पण जैस्वालने झळकावलं 17 व्या सिजनमधील पहिलं अर्धशतक

जैस्वालला आत्तापर्यंत आयपीएलच्या 17 व्या हंगामात आत्तापर्यंत मोठी खेळी करता आली नव्हती. परंतु, त्याने मुंबईविरुद्ध मात्र शानदार खेळी केली. यासह त्याने 31 चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले. हे त्याचे 17 व्या हंगामातील पहिले अर्धशतक आहे.

IPL 2024 RR vs MI Live Score : पीयुष चावलाने मुंबईला मिळवून दिले पहिले यश; बटलर क्लिन-बोल्ड

चांगल्या सुरुवातीनंतर राजस्थानला 8 व्या षटकात राजस्थानला पहिला धक्का मिळाला. राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरला पीयुष चावलाने 8 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. बटलरने 25 चेंडूत 35 धावा केल्या.

IPL 2024 RR vs MI Live Score : पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला सुरुवात; बटलर-जैस्वालची जोडी फलंदाजीसाठी मैदानात

पावसाच्या व्यत्ययानंतर पावणे अकरा वाजता पुन्हा खेळाला सुरुवात झाली असून एकही षटक कमी करण्यात आलेले नाही. राजस्थानकडून जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल फलंदाजीला उतरले आहेत. तसेच मुंबईकडून 7 व्या षटकात गोलंदासाठी मोहम्मद नबीच्या हातात चेंडू सोपवण्यात आला आहे.

IPL 2024 RR vs MI Live Score : पावसामुळे राजस्थान-मुंबई सामना थांबला, पुन्हा कधी होणार खेळाला सुरुवात?

पावसामुळे मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामना थांबला आहे. दरम्यान नवीन अपडेट नुसार पाऊस थांबला असून कव्हर्सही खेळपट्टीवरून हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता रात्री 10.45 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

IPL 2024 RR vs MI Live Score : जयपूरमध्ये पावसाचं आगमन, राजस्थान-मुंबई सामना थांबवावा लागला

पॉवर-प्लेच्या 6 षटकांनंतर जयपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या सामन्याला काही वेळासाठी थांबवावे लागले आहे.

IPL 2024 RR vs MI Live Score : पॉवर-प्लेमध्ये बटरल-जैस्वालची फटकेबाजी; राजस्थानच्या 60 धावाही पार

मुंबईने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी राजस्थानकडून सलामीला यशस्वी जैस्वालसह इम्पॅक्ट प्लेअर सब्स्टीट्युट म्हणून जॉस बटलर उतरला. या दोघांनाही सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरू केली.

त्यामुळे पॉवर-प्लेच्या 6 षटकात राजस्थानने एकही विकेट न गमावता 61 धावा केल्या. बटलर 18 चेंडूत 28 धावांवर नाबाद आहे. तसेच यशस्वी जयस्वालने 18 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आहेत.

IPL 2024 RR vs MI Live Score : तिलक-वढेराची फटकेबाजी, पण संदीप शर्मानेही मारला पंजा; मुंबईचे राजस्थानसमोर 180 धावांचं टार्गेट

आयपीएल 2024 चा 38 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 179 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानसमोर विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य आहे.

मुंबईकडून तिलक वर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली, तर नेहल वढेराने 24 चेंडूत 49 धावांची खेळी केली. राजस्थानकडून गोलंदाजीत संदीप शर्माने 4 षटकात 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या, तर आवेश खान आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 RR vs MI Live Score : संदीप शर्माचे शेवटच्या ओव्हरमध्ये तिहेरी धक्के

या सामन्यात शानदार अर्धशतक करणाऱ्या तिलक वर्माला 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संदीप शर्माने बाद केले. त्याचा झेल पॉवेलने घेतला. त्यामुळे त्याला 45 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावा करून माघारी परतावे लागले.

त्यानंतर जेराल्ड कोएत्झीलाही शुन्यावर संदीपने बाद केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर संदीपने टीम डेविडला रियान परागच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे संदीपने त्याच्या 5 विकेट्सही पूर्ण केल्या. अखेरीस मुंबईला 20 षटकात 9 बाद 179 धावा करता आल्या.

IPL 2024 RR vs MI Live Score : आवेशने मुंबईच्या कर्णधाराला धाडलं माघारी, हार्दिक 10 धावा करून आऊट

वढेरा बाद झाल्यानंतर 7 व्या क्रमांकावर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या उतरला. मात्र, त्याला खेळपट्टीवर फार काळ टिकू न देण्याची जबाबदारी आवेश खानने उचलली. त्याने 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याला पायचीत पकडले. त्यामुळे हार्दिकला 10 चेंडूत 10 धावा करून माघारी परतावे लागले.

IPL 2024 RR vs MI Live Score : वढेराचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं; मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

तिलकची शानदार साथ देणारा वढेराही अर्धशतक करेल, असं वाटत असतानाच तो १७ व्या षटकात बाद झाला. तो बोल्डच्या गोलंदाजीवर संदीप शर्माकडे झेल देत बाद झाला. त्यामुळे त्याचे अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकले.

त्याने 24 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 49 धावा केल्या. दरम्यान, त्याने तिलकसह 99 धावांची भागीदारीही केली. त्यामुळे मुंबईला 150 धावांचा टप्पाही पार करता आला.

IPL 2024 RR vs MI Live Score : सुरुवातीच्या पडझडीनंतर तिलकचं शानदार अर्धशतक; वढेरानेही दिली दमदार साथ

मुंबईने आठ षटकांच्या आतच 4 विकेट्स गमावल्यानंतर तिलक वर्मा आणि नेहल वढेराने संघाचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. त्यांची भागीदारी रंगत असतानाच तिलकने युजवेंद्र चहलने गोलंदाजी केलेल्या 16 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले.

यानंतरच्या चेंडूवर त्याला पंचांनी पायचीत दिले होते. परंतु, रिव्ह्यु घेतल्यानंतर तो त्यात नो-बॉल असल्याचे दिसले, त्यामुळे पंचांना निर्णय बदलावा लागला.

IPL 2024 RR vs MI Live Score : युजवेंद्र चहलने मुंबईला चौथा धक्का देत रचला इतिहास

मुंबईने पॉवर-प्लेच्या 6 षटकात 3 बाद 45 धावा केल्या होत्या. त्यानंतर युजवेंद्र चहलने मुंबईला चौथा धक्का दिला. त्याने 8 व्या षटकात मोहम्मद नबीला आपल्याच चेंडूवर झेल घेत बाद केले. ही त्याची आयपीएलमधील 200 वी विकेट ठरली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

IPL 2024 RR vs MI Live Score : संदीप शर्माने मुंबईला दिला तिसरा धक्का; सूर्यकुमार यादवलाही स्वस्तात धाडलं पॅव्हेलियनमध्ये

सलामीवीर माघारी परतल्यानंतर मुंबईचा डाव सावरण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर होती. परंतु, चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्माने सूर्यकुमारचा अडथळा दूर केला.

सूर्याने मिड-विकेटवरून शॉट मारण्याचा प्रयत्न केलेला, परंतु रोवमन पॉवेलने त्याचा झेल घेतला. त्यामुळे सूर्या 8 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर मोहम्मद नबी फलंदाजीला आला आहे. दरम्यान मुंबईची अवस्था 3 बाद 20 धावा अशी झाली आहे.

IPL 2024 RR vs MI Live Score : मुंबईला पहिल्या दोन ओव्हरमध्ये मोठे धक्के, रोहित-ईशान आऊट होत परतले माघारी

रोहित बाद झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात संदीप शर्माने तिसऱ्या चेंडूवर ईशान किशनला बाद केले. त्याचाही झेल सॅमसनने घेतला. परंतु आधी पंचांनी त्याला नाबाद दिले होते, त्यामुळे राजस्थानने रिव्ह्युची मागणी केली.

रिव्ह्युमध्ये चेंडू ईशानच्या बॅटला घासून गेल्याचे दिसले. त्यामुळे ईशानला माघारी परतावे लागले. ईशान बाद झाल्यानंतर तिलक वर्मा फलंदाजीला आला आहे.

IPL 2024 RR vs MI Live Score : बोल्टने दिला मुंबईला पहिला तडगा धक्का! रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान शर्मा यांनी डावाची सुरुवात केली आहे. मात्र पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने रोहितला बाद केले. रोहितने त्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चेंडू उंच उडाला आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनने त्याचा झेल घेतला. त्यामुळे रोहित 6 धावा करून माघारी परतला.

IPL 2024 RR vs MI Live Score : मुंबई-राजस्थानचे प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, डेवाल्ड ब्रेविस

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - जोस बटलर, केशव महाराज, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर

IPL 2024 RR vs MI Live Score : हार्दिक पांड्याने जिंकला टॉस

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2024 RR vs MI Live Score : राजस्थान-मुंबई सामन्याला लवकरच होणार सुरुवात; असा राहिलाय हेड-टू-हेड रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आत्तापर्यंत 29 सामन्यांत आमने-सामने आले आहेत. यातील 15 सामने मुंबईने जिंकले आहेत, तर 13 सामने राजस्थानने जिंकले आहेत. तसेत एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

IPL 2024 RR vs MI Live Score : राजस्थान-मुंबई सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या कसे असेल जयपूरमध्ये हवामान

संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना खेळला जाईल. Accuweather नुसार, जयपूरमध्ये दिवसा तापमान सुमारे 35°C आणि रात्री 25°C असण्याची अपेक्षा आहे. आकाश निरभ्र राहील, तर रात्री काही ढग असतील. दिवसा सुमारे 4% आणि रात्री 2% पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IPL 2024 Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Scorecard : आयपीएल 2024 चा 38 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल.

राजस्थान संघाने या हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना हारला आहे. सात सामन्यांत 12 गुणांसह तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

तर मुंबई इंडियन्स संघाचे सात सामन्यांत केवळ सहा गुण आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी ते वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने आले होते. राजस्थानने हा सामना सहा विकेटने जिंकला.

मुंबई इंडियन्सचा संघ आता हळूहळू लयीत येत असून, राजस्थानविरुद्धच्या मागील पराभवाच्या गुणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT