Chennai Super Kings | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024, CSK vs GT: चेन्नईच्या चेपॉकवर ऋतुच्याच शिलेदारांचे 'राज', गुजरातविरुद्ध मिळवला सर्वात मोठा विजय

Chennai Super Kings Win: चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएलच्या सातव्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

Pranali Kodre

IPL 2024, CSK vs GT: 'कॅचेस विन यू मॅचेस' असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं... हेच चेन्नई सुपर किंग्स संघाने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं. आयपीएलच्या १७ व्या सिजनच्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमने-सामने होते.

गतविजेते अन् गतउपविजेते असलेल्या या संघांना यंदाच्या हंगामात दोन नव्या दमाचे कर्णधार लाभलेत, त्यामुळे त्यादृष्टीनेही या सामन्याला होतं आणि त्याचमुळे या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष होते.

हार्दिक पांड्यानंतर गुजरातचे नेतृत्व लाभलेल्या गिलने या सामन्यात टॉस जिंकून सुरुवात तर चांगली केली, परंतु गुजरातसाठी ती एकच गोष्ट या सामन्यात त्यांच्या पारड्यात पडली, कारण त्यानंतर ऋतुराज गायकवाडच्या चेन्नईच्या शिलेदारांनी संपूर्ण सामन्यात वर्चस्व ठेवलं. गिलने चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. चेन्नईची नवी सलामी जोडी ऋतुराज आणि रचिन मैदानात उतरले.

ऋतुराज अवघ्या एका धावेवर असताना साई सुदर्शनने त्याचा अगदी सोपा कॅच सोडला, यानंतर मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी वर्चस्व ठेवण्यास सुरूवात केली. एका बाजूने ऋतुराज स्थिरावण्यासाठी वेळ घेत असताना रचिनने घणाघात सुरू केला, त्याने आधी उमेश यादवला टार्गेट केलं आणि त्यानंतर त्याने गुजरातची गोलंदाजी स्थिरावूच दिली नाही. यावेळी गुजरातला मोहम्मद शमीची कमी प्रकर्षाने जाणवली.

त्याचा हा आक्रमक पण तंत्रशुद्ध खेळ पाहाताना गिलने राशिद खानला लवकर गोलंदाजीला बोलावलं, राशिदने आपलं काम केलं, त्यानं धोकादायक रचिनला चकवलं अन् वृद्धिमान साहाने चपळता दाखवत त्याला स्टंप आउट केलं. जवळपास २३० च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या रचिनचं अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकलं.

त्यानंतर मात्र गुजरातने चेन्नईच्या धावगतीला लगाम लावला असं वाटत असतानाच ऋतुराजने काही अप्रतिम शॉट्स खेळत १० षटकापंर्यत संघ १०० धावा पार करेल याची काळजी घेतली, त्यातच गुजरातच्या या सामन्यातील ढिसाळ क्षेत्ररक्षणाचं आणखी एक उदाहरण नवव्या षटकात पाहायला मिळालं, विजय शंकर अन् डेव्हिड मिलर यांच्यात झालेल्या गोंधळाने रहाणे आणि ऋतुराज चक्क चार धावा पळाले.

पण रहाणेलाही साई किशोरच्या गोलंदाजीवर साहानेच स्टंप आऊट केलं. मात्र आगीतून उठून फुफाट्यात अशी गुजरातची अवस्था झाली, शिवम दुबेने आल्या आल्याच पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. यानंतर १९ व्या षटकापर्यंत चेपॉकच्या मैदानात दुबेचा शो पाहायला मिळाला... या दरम्यान कर्णधार ऋतुराज एक महत्त्वाची आणि संयमी ४६ धावांची खेळी करून गेला.

दुबेने गुजरातच्या कोणत्याच गोलंदाजाला वरचढ होण्याची संधीच दिली नाही... ५ षटकारांची बरसात करत त्यानं अर्धशतक साकारलं. अखेर त्याला बाद करण्यात राशिदलाच यश मिळालं त्याने ५१ धावांवर दुबेची तुफानी खेळी संपवली. यावेळी दुसरी बाजू डॅरिल मिचेल सांभाळत होता, पण त्याला फारसा सूर गवसत नसल्याचे दिसत मात्र समोरून धावा होत असल्याने चेन्नईचं धावफलक सातत्याने पळताना दिसलं.

मोठ्या धावा झाल्याचं लक्षात आल्यानं चेन्नईने जडेजा अन् धोनीला मागे थांबवत समीर रिझवीला मैदानात पाठवलं, चेन्नईकडून पहिल्यांदाच फलंदाजीला उतरलेल्या रिझवीने तो ज्यासाठी ओळखला जातो, त्याची चुणूक पहिलाच चेंडू खेळताना दाखवली, त्याने पहिल्याच चेंडूवर राशिदविरुद्ध खणखणीत चौकार ठोकला. तो अवघ्या ६ चेंडूत १४ धावा करत बाद झाला.

परंतु, एकवेळ चेन्नई २२० पर्यंत पोहचेल असं वाटत होतं, पण गिलने डावाच्या अखेरीस चांगले नेतृत्व केलं, मोहित शर्माने शेवटचे षटक महागडे ठरणार नाही याची काळजी घेतली आणि चेन्नईला ६ बाद २०६ धावांवर रोखलं.

गुजरातच्या संघाचीही फलंदाजी तगडी आहे, त्यामुळे २०६ धावांचं आव्हान पेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे अशी चर्चा होत असतानाच वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांची सलामी जोडी मैदानात उतरली. साहाने पहिल्या दोन षटकातच आक्रमक दाखवली, मात्र ही जोडी धोकादायक ठरणार नाही, याची काळजी दिपक चाहरने घेतली, त्याने कर्णधार गिलला ८ धावांवरच माघारी धाडले, यानंतर गुजरातच्या धावांचा ओघ ओसरला.

तुषार देशपांडे आणि चाहर यांनी पॉवरप्लेमध्ये गुजरातचे फलंदाजांना भारी पडू दिलं नाही. साहा पण पॉवरप्लेमध्येच आऊट झाला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या साई सुदर्शन आणि विजय शंकर यांनी गुजरातचा डाव सावरायला सुरुवात केलेली, पण कर्णधार ऋतुराजने डॅरिल मिचेलला गोलंदाजी देत खेळलेली चाल कामी आली. आठव्या षटकात त्याच्या गोलंदाजीवर ४२ वर्षांच्या एमएस धोनीने कमालीचा फिटनेस दाखवला आणि डाईव्ह मारत कॅच घेतला.

त्यानंतरही डेव्हिड मिलरचा धोका होताच... पण रहाणेचा कॅच या सामन्याचा टर्निंग पाँइंट ठरला. १२ व्या षटकात तुषार देशपांडेने लेग स्टंपला चेंडू टाकला अन् मिलरने जोरदार शॉट मारला... पण डीप मिड - विकेटला सेफ हँड्स समजला जाणारा रहाणे होता, त्याने सूर मारत दोन हातांनी अफलातून कॅच घेतला अन् मिलर २१ धावांत परत फिरला. यानंतर मात्र गुजरातचा संघ पुनरागमन करू शकला नाही. चेन्नईच्या गोलंदाजींनी टाकलेला फासा आणखी आवळला.

मधल्या षटकात नेहमीप्रमाणे जडेजाची किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाली, तर मुस्तफिजूर, पाथिरानाने डेथ बॉलिंग सांभाळली. रचिन रविंद्रने सुरुवातीला सोडलेल्या कॅचनंतर तीन अप्रतिम कॅच पकडत त्याची भरपाई केली.

गुजरातचा संघ २० षटकात ८ बाद १४३ धावाच करू शकला. त्यामुळे चेन्नईने ६३ धावांनी विजय मिळवला... हा गुजरातचा धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा पराभव ठरला. या सामन्यात क्षेत्ररक्षण हा सर्वात मोठा फरक चेन्नई आणि गुजरात संघात दिसला, गुजरातला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला, तर चेन्नईच्या खेळाडूंनी घेतलेल्या कॅचेसने त्यांना सामन्यात कायम ठेवलं. यासह नवा कर्णधार ऋतुराजच्या नेतृत्वाची सलग दोन विजयांनी दणक्यात सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT