Sunrisers Hyderabad IPL 2024 Final : करो या मरो सामन्यात पुन्हा संजू सॅमसननं टॉस जिंकला होता. आरसीबीविरूद्ध देखील त्यानं टॉस जिंकत अर्धी लढाई जिंकली होती. आजही कमिन्सचं अन् हैदराबादचं नशीब फुटकं असणार असं वाटत होतं. मात्र संजूनं टॉस जिंकून सामना जिंकल्यात जमा आहे असं कोणी धाडसानं म्हणत नव्हतं. कारण आजच्या सामन्याचा जय पराजय हा जसा चांगला आणि वाईट खेळ करण्यावर अवलंबून होता तसाच तो दवबिंदूंवर देखील अवलंबून होता.
टॉस जिंकला त्यानंतर धावांचा पाऊस पाडणाऱ्या एक एक हैदराबादी फलंदाजांना राजस्थानच्या बॉलर्सनी पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. पॉवर प्लेमध्ये ट्रेंट बोल्ट हैदराबादच्या राशीला लागला. त्यानं अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी अन् एडिन मार्करमची शिकार केली. त्रिपाठी मोठा धमाका करण्याच्या तयारीत होता. मात्र बोल्टसमोर त्याला मोठी मजल मारता आली नाही.
राजस्थाननं पॉवर प्लेनंतर हैदराबादच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली. आवेश खाननं पुन्हा एकदा जलवा दाखवला अन् हैदराबादला स्लॉग ओव्हरमध्ये टेन्शन दिलं. क्लासेन एकाकी झुंज देत होता. त्यानं अर्धशतकी खेळी केली. त्याची बॅट आता आग ओकणार असं वाटत असतानाच संदीप शर्मानं मोक्याच्या क्षणी त्याला गार केलं.
राजस्थाननं हैदराबादला 175 धावात रोखलं. चेपॉकवरचा यापूर्वीचा ट्रेंड पाहिला तर हे टार्गेट फार छोटं वाटत होतं. राजस्थाननं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. मात्र राजस्थानच्या या चांगल्या खेळावर ढगाळ वातावरणानं पाणी फेरलं.
ज्यावेळी राजस्थाननं टॉस जिंकला त्यावेळी संजूनं दुसऱ्या डावात दवबिंदू आमच्या मदतीला येतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र दवबिंदूंनी आज आळस केला अन् ते मैदानवर पडलेच नाहीत. दवबिंदूंनी एकप्रकारे राजस्थानची मजाच केली.
चेपॉकवर जर दुसऱ्या डावात दवबिंदू पडले नाहीत तर पिच संथ अन् फिरकीला पोषक होतं. राजस्थान अन् हैदराबादच्या सामन्यात तेच झालं. राजस्थानचा पॉवर प्ले संथ गेला. शेवटी शेवटी यशस्वीनं फटकेबाजी करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र पॉवर प्लेनंतर स्पिनर्सनी राजस्थानच्या नाकत दम करून ठेवला. त्यांनी यशस्वी अन् संजूला हात खोलण्याची संधीच दिली नाही. रनरेट ड्रॉप होऊ लागल्यानं आधी यशस्वी अन् मग संजू फटकेबीजीच्या नादात बाद झाला. राजस्थानचा संकट मोचक रियान परागही आजच्या सामन्यात फार काही करू शकला नाही.
दरम्यान, ध्रुव जुरेलनं एक बाजू लावून धरली होती. मात्र रन्स अन् बॉल्स मधील अंतर वाढत चाललं होतं. त्यात अश्विन, हेटमायर, पॉवल सारख्या सगळ्यांनी साथ सोडली होती. तरी जुरेल शेवटच्या षटकापर्यंत लढत राहिला.
अखेर शेवटच्या षटकात विजयासाठी 42 धावांचं अशक्यप्राय टार्गेट राहिलं अन् राजस्थानचं 16 वर्षानंतर आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव करण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलं. हैदराबादनं सामना 36 धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. आता हंगामातील लीग स्टेजच्या दोन टॉप टीम विजेतेपदासाठी भिडणार.
कमिन्स भारतात आपल्या दुसऱ्या मोठ्या विजेतेपदाच्या एकच पाऊल लांब आहे. कमिन्सचा हा इंडियातील धडाका श्रेयस अय्यरची केकेआर रोखणार का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.