Sanju Samson Wicket Controversy :आयपीएल 2024 स्पर्धेतील 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. मंगळवारी झालेल्या या सामन्यात दिल्लीने 20 धावांनी विजय मिळवला.
दरम्यान राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची विकेट या सामन्याला कलाटणी देणारी ठरली, पण आता हीच विकेट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
झाले असे की या सामन्यात दिल्लीने राजस्थान समोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने पहिली विकेट डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर गमावली. त्यामुळे सॅमसनला पहिल्याच षटकात मैदानात उतरावे लागले.
त्याने नंतर आक्रमक खेळ करताना अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक केले. होते. त्याने जॉस बटलर, रियान पराग आणि शुभमन दुबे यांच्याबरोबर चांगल्या भागीदारीही केल्या. त्यामुळे १५ षटकांच्या आतच त्याने राजस्तानला 150 धावांचा टप्पा गाठून दिला होता. त्यावेळी तो ज्याप्रकारे खेळत होता, त्यामुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा उंचावलेल्या होत्या.
मात्र, 16 व्या षटकात मुकेश कुमार गोलंदाजीला आला. त्याने या षटकात टाकलेल्या चौथ्या चेंडूवर संजू सॅमसनने लाँग ऑनला मोठा फटका मारला. पण त्यावेळी बाउंड्री लाईनवर असलेल्या शाय होपने तो चेंडू झेलला. पण हा चेंडू झेलताना तो बाउंड्री लाईनच्या अत्यंत जवळ होता. त्यावेळी त्याने तो पाय बाउंड्री लाईनला लागणार नाही यांची काळजी घेताना दिसला.
त्यानंतर त्याने झेल घेताना पाय बाउंड्री लाईनला लागला की नाही, याचा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवण्यात आला. रिप्ले पाहिल्यानंतर त्याचा पाय लाईनला लागला की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. पण थर्ड अंपायरने तो झेल दिला आणि त्यामुळे सॅमसनला माघारी परतावे लागले.
दरम्यान, या निर्णयावर सॅमसन अत्यंत निराश होता. त्याने याबाबत मैदानावरील पंचांकडे चर्चाही केली. तसेच राजस्थान रॉयल्सच्या डगआऊटमधील सदस्यांचेही मत होते की सॅमसन नाबाद आहे. मात्र, याचवेळी स्टँडमध्ये बसलेले दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल मात्र उत्साहाने 'आऊट...आऊट' असं ओरडताना दिसले. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, सॅमसनची ही विकेट वादग्रस्त ठरली आहे. काहींच्या मते होपचा पाय बाउंड्री लाईनला लागला नव्हता, तर काहींच्या मते त्याच्या पायाचा हलकासा स्पर्श बाउंड्री लाईनला झाला होता.
दरम्यान सॅमसनने 46 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 86 धावा केल्या. त्याची विकेट गेल्यानंतर शेवटच्या चार षटकात राजस्थानने आणखी 4 विकेट्स गमावल्या. त्यामुळे राजस्थानला 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर दिल्लीकडून गोलंदाजीत खलील अहमद, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि रसिक सलाम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीने 20 षटकात 8 बाद 221 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून अभिषेक पोरेलने 36 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावांची खेळी केली. त्याचबरोबर जॅक फ्रेझर-मॅकगर्कने 20 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 50 धावांची खेळी केली, तर ट्रिस्टन स्टब्सने 20 चेंडूत 41 धावा केल्या.
राजस्थानकडून गोलंदाजीत आर अश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.