हैदराबाद - कोलकता नाईट रायडर्सने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादवर ५ धावांनी निसटता विजय मिळवला आणि आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आपले आव्हान कायम राखले. कोलकता नाईट रायडर्सचा हा चौथा विजय ठरला.
सनरायझर्स हैदराबादला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. नितीश राणा (४२ धावा), रिंकू सिंग (४६ धावा), आंद्रे रस्सेल (२४ धावा व १/१५), शार्दूल ठाकूर (२/२३) यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर कोलकता नाईट रायडर्सने महत्त्वपूर्ण विजयाला गवसणी घातली.
कोलकता संघाकडून हैदराबादसमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मयांक अगरवाल (१८ धावा), अभिषेक शर्मा (९ धावा) व राहुल त्रिपाठी (२० धावा) यांना याही लढतीत मोठी खेळी करता आली नाही. हर्षित राणा, शार्दूल ठाकूर व आंद्रे रस्सेल या तिघांनी अनुक्रमे तिन्ही फलंदाजांना बाद केले.
अनुकूल रॉयने हॅरी ब्रुकला शून्यावर पायचीत करून मोठा धक्का दिला. त्यानंतर कर्णधार एडन मार्करम व हेन्रीच क्लासेन जोडीने ७० धावांची भागीदारी करताना हैदराबादच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. शार्दूल पुन्हा कोलकतासाठी धावून आला. त्याने क्लासेनला ३६ धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला.
त्यानंतर वैभव अरोराने मार्करमला ४१ धावांवर बाद केले. अखेरच्या षटकात विजयासाठी हैदराबादसमोर ९ धावांची आवश्यकता असताना फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या हाती चेंडू सोपवण्यात आला. त्याने फक्त ३ धावा दिल्या. हैदराबादला ८ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान, कोलकता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर रहमानुल्लाह गुरबाज (०) व व्यंकटेश अय्यर (७ धावा) हे झटपट बाद झाले. कार्तिक त्यागीने जेसन रॉयलाही २० धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ३ बाद ३५ या धावसंख्येवरून कर्णधार नितीश राणा व रिंकू सिंग या जोडीने कोलकताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
दोघांनी ६१ धावांची भागीदारी रचली. हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम याने अदभुत कौशल्याच्या जोरावर ही जोडी तोडली. त्याने स्वत:च्या गोलंदाजीवर नितीशला बाद केले. पण त्याने गोलंदाजी करताना नितीशचा २० यार्डापेक्षा पुढे जाऊन टिपलेला झेल वाखाणण्याजोगा होता. नितीशने ४२ धावांची खेळी केली.
त्यानंतर रिंकू, आंद्रे रस्सेल व अनुकूल रॉय यांनी कोलकता संघाच्या धावसंख्येत भर टाकली. रिंकूने या मोसमात छान फलंदाजी केली आहे. त्याने ४ चौकार व १ षटकारासह ४६ धावांची खेळी केली. रस्सेलने २४ धावांची व अनुकूलने नाबाद १३ धावांची खेळी केली. टी.नटराजनने अखेरच्या षटकांत प्रभावी कामगिरी केली. हैदराबादकडून यान्सेन व नटराजन यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक
कोलकता नाईट रायडर्स २० षटकांत ९ बाद १७१ धावा (जेसन रॉय २०, नितीश राणा ४२, रिंकू सिंग ४६, आंद्रे रस्सेल २४, मार्को यान्सेन २/२४, टी.नटराजन २/३०) विजयी वि. सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत ८ बाद १६६ धावा (एडन मार्करम ४१, हेनरीच क्लासेन ३६, शार्दूल ठाकूर २/२३)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.