Gujarat Titans vs Lucknow Super Giants IPL: मोहम्मद शमी ने 25 धावा खर्च करुन घेतलेल्या तीन विकेट्स आणि राहुल तेवतियाने अखेरच्या टप्प्यात 24 चेंडूत कुटलेल्या 40 धांवांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) आपल्या पहिल्या हंगामाची सुरुवात विजयानं केलीये. त्यांनी लखनऊ सुपर जाएंट्स संघाला (Lucknow Super Giants) पाच विकेट्सनी मात दिली. हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना लखनऊची सुरुवात खराब झाली. पण यातून सावरत त्यांनी 158 धावांपर्यंत मजल मारली होती. गुजरातने 5 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा करत विजय मिळवला.
लखनऊच्या संघाची अवस्था सुरुवात खूपच बिकट झाली होती. पाचव्या षटकात त्यांनी 29 धावांवर आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. संघ अडचणीत असताना आयुष बडोनी (Ayush Badoni) आणि दिपक हुड्डा यांनी दमदार भागीदारी करत संघाचा डाव सावरला. कृणाल पांड्याने अखेरच्या षटकात 13 चेंडूत नाबाद 21 धावा करत संघाची धावसंख्या 158 पर्यंत पोहचवली. लखनऊने सामना गमावला असला तरी आयुष बडोनीने (Ayush Badoni) आपल्या खेळीनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. त्याने अर्धशतकी खेळी केली. आपल्या दमदार खेळीत त्याने राशिद खानचाही चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. अनुभवी फिरकीपटूसमोर त्याने ज्या तोऱ्यात फलंदाजी केली ती डोळ्याचे पारणे फेडणारी अशीच होती.
कोण आहे आयुष बडोनी (Ayush Badoni)
आयुष बडोनी (Ayush Badoni Fifty) याने आयपीएलच्या पदार्पणातील सामन्यात धमाकेदार एन्ट्री केली. त्याने 41 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या मेगा लिलावात बडोनीला लखनऊने 20 लाख रुपयांत खरेदी केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोनी दिल्लीच्या संघाचे प्रतिनिधीत्व करतो. त्याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्वही केले आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा या युवा खेळाडून 2018 मध्ये आशियाई कप स्पर्धेत प्रकाश झोतात आला होता. भारतीय अंडर 19 संघाचे नेतृत्व करताना त्याने श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात 28 चेंडूत 52 धावांची स्फोटक खेळी साकारली होती.
श्रीलंका विरुद्ध 185 धावांची खेळीही ठरली होती लक्षवेधी
आयुष बडोनी याने फलंदाजीसह गोलंदाजीतही धमक दाखवून दिली होती. 2018 मध्ये श्रीलंका अंडर-19 संघाविरुद्ध यूथ कसोटी सामन्यात त्याने नाबाद 185 धावांची खेळी केली होती. या सामन्यात बडोनी याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन कोलंबोच्या मैदानात त्याने 185 धावा कुटल्या होत्या.
बडोनीच्या अर्धशतकात गौतम गंभीरचा वाटा
गुजरात विरुद्धच्या सामन्यात बडोनीने 41 चेंडूत 54 धावांची खेळी करुन संघाला अडचणीतून बाहेर काढले. 22 वर्षीय खेळाडूला क्रुणाल पाड्याच्या आधी प्रमोशन देण्यात आले होते. मेंटॉर गौतम गंभीरच्या या निर्णयाचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पदार्पणाच्या सामन्यात बडोनीच्या च्या यशाचे श्रेय गौतम गंभीरला द्यावे लागेल, असा सूर उमटताना दिसतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.