Delhi Capitals News : इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत शुक्रवारी (12 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स संघाला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात दिल्लीच्या विजयात युवा जॅक फ्रेझर-मॅकगर्कने मोलाचा वाटा उचलला.
लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने दिल्लीसमोर 168 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीसाठी फ्रेझर-मॅकगर्कने 35 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 55 धावांची खेळी केली.
विशेष म्हणजे हा त्याचा पहिलाच आयपीएल सामना होता. खरंतर तो आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला होता. परंतु, लुंगी एन्गिडी दुखापतीमुळे 17 व्या आयपीएल हंगामातून बाहेर गेल्याने 22 वर्षीय फ्रेझर-मॅकगर्कला दिल्लीने बदली खेळाडू म्हणून संधी दिली.
विशेष म्हणजे दिल्ली संघात आल्यानंतर पदार्पणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 11 एप्रिलला त्याने त्याचा 22 वा वाढदिवस साजरा केला.
फ्रेझर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथील असून असून त्याने ऑस्ट्रेलियाच्या विविध वयोगटातील संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तो 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघातही खेळला आहे.
त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हिक्टोरिया संघासाठी कमी वयातच शानदार कामगिरी केली असून त्याच्याकडे सध्या ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. त्याने बीबीएलमध्ये ही शानदार खेळी केली होती. रिकी पाँटिंगनेही त्याचे कौतुक करताना तो डेव्हिड वॉर्रनच्या तरुणपणाची आठवण करून देत असल्याचे म्हटले होते.
इतकेच नाही, तर त्याच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रमही आहे. त्याने 8 ऑक्टोबर 2023 रोजी साऊथ ऑस्ट्रेलियाकडून टास्मानियाविरुद्ध खेळताना 29 चेंडूत शतक केले होते. त्यावेळी त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये एबी डिविलियर्सच्या 31 चेंडूतील शतकाचा विश्वविक्रम मोडला होता.
त्याने सातत्याने केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघातही या वर्षाच्या सुरुवातीला जागा मिळाली. त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून 2 वनडे सामने खेळले. यात त्याने 51 धावा केल्या.
फ्रेझर-मॅकगर्कने दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिलाच सामना खेळताना काही विक्रमही केले. त्याने दिल्लीसाठी पदार्पणाच्या सामन्यात सर्वोच्च खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर गौतम गंभीर आहे. गंभीरने दिल्लीसाठी पहिल्या आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद 58 धावांची खेळी केली होती.
याशिवाय आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज करताना सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही फ्रेझर-मॅकगर्क दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत मायकल हसीने 2008 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 116 धावांची नाबाद खेळी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.