IPL 2024, MI vs RR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 14वा सामना सोमवारी (1 एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. हा सामना मुंबईचे घरचे मैदान वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
दरम्यान, हा दोन्ही संघांचा यंदाच्या हंगामातील प्रत्येकी तिसरा सामना आहे. मुंबईने अद्याप विजय मिळवलेला नाही, तर राजस्थानने अद्याप पराभव स्विकारलेला नाही. तसेच मुंबई पहिल्यांदाच यंदाच्या हंगामात सोमवारी घरच्या मैदानात सामना खेळणार आहे, तर राजस्थानही जयपूरच्या बाहेर पहिल्यांदाच सामना खेळणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
दरम्यान, घरच्या मैदानावर खेळणारा मुंबई संघाला या सामन्यासाठी विजयाचा प्रबळ दावेदार समजले जात आहे. पण असे का याच्या कारणांचा आढावा घेऊ.
मुंबईची ताकद ही त्यांची फलंदाजी आहे. त्यातच हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या मैदानात संध्याकाळच्या वेळेत मोठ्या धावाही होऊ शकतात. त्याचाच फायदा मुंबईच्या फलंदाजांनाही होऊ शकतो. त्याचबरोबर मुंबईचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
जर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी चांगली सुरुवात दिली, तर त्याचे रुपांतर मोठ्या धावसंख्येत करण्याची क्षमता मुंबईच्या मधल्या फळीत आहे. मुंबईकडून मधल्या फळीत तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि टीम डेव्हिड असे आक्रमक फलंदाजी करू शकणारे फलंदाज आहेत.
याशिवाय शम्स मुलानी हा अष्टपैलू खेळाडूही या सामन्यात महत्त्वाचा वाटा उचलू शकतो. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो मुंबईकडून खेळतो. त्यामुळे त्याला वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा मोठा अनुभव देखील आहे.
दरम्यान, राजस्थानची फलंदाजीही तगडी असली, तरी अद्याप यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर यांना सूर सापडलेला नाही. त्यामुळे राजस्थानच्या मधल्या फळीवर दबाव येत आहे. तसेच त्यांच्या फलंदाजीत खूप सखोलता नाही.
त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजीची मदार सध्या संजू सॅमसन आणि रियान परागवर आहे. तसेच या सामन्यात जर पराग आणि जैस्वाल यांना या सामन्यात सूर सापडला, तर मात्र राजस्थानही मोठी धावसंख्या उभारू शकतात. तरी तुलना करायची झाल्यास फलंदाजीच्या बाबत मुंबईचे पारडे जड आहे.
मुंबईसाठी या सामन्यात जमेची बाजू म्हणजे घरचे मैदान. हंगामापूर्वीही मुंबई संघाने इथे सराव केला आहे. तसेच मुंबईचा संघ या खेळपट्टीशी परिचीत आहे. त्यामुळे घरच्या मैदानाचा फायदा मुंबईला होऊ शकतो.
मुंबईने 2023 आयपीएलमधील घरच्या मैदानातील 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तसेच मुंबईच्या संघाला घरच्या प्रेक्षकांचाही पाठिंबा मिळेल. ज्यामुळे संघाचे मनोबलही वाढण्यात मदत होऊ शकते.
इतकेच नाही, मुंबईला पहिल्या विजयाची प्रतिक्षा असताना तो विजय मुंबईच मिळवण्यासाठी संघ उत्सुक असेल.
मुंबईसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराहची 4 षटके आहेत. जर कर्णधार हार्दिक पंड्याने बुमराहच्या 4 षटकांच्या योग्यवेळी वापर केला, तर त्याचा फायदा मुंबईला होऊ शकतो.
बुमराह सध्या चांगल्या फॉर्ममध्येही आहे, त्यामुळे प्रतिस्पर्धी त्याच्याविरुद्ध बचावात्मक पवित्रा घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची गोलंदाजी याही सामन्यात महत्त्वाची ठरेल, त्याचबरोबर गेराल्ड कोएत्झीवर देखील मुंबईच्या मोठ्या आशा असतील.
दरम्यान, गोलंदाजीच्या बाबत राजस्थानकडे अधिक अनुभव असला, तरी मुंबई मोठ्या फलंदाजी फळीला रोखण्याचे आव्हान त्यांना असेल. त्यातही ट्रेंट बोल्टच्या पॉवरप्लेमधील षटकांमध्ये विकेट्स मिळण्याची आशा राजस्थानला असेल.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आत्तापर्यंत 28 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील 15 सामने मुंबईने जिंकले आहेत, तर 12 सामने राजस्थानने जिंकले आहेत. त्याचबरोबर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
याशिवाय या दोन संघात झालेल्या शेवटच्या 5 सामन्यांपैकी 4 सामने मुंबईने जिंकले आहेत. त्यामुळे आमने-सामने आकडेवारी पाहाता देखील मुंबई राजस्थानला वरचढ ठरल्याचे दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.