जॅक ड्रॅपर इंग्लंडचा उगवता टेनिसपटू. सुखवस्तू घरातून आलेला, तरीही कष्टाळू. टीकाटिप्पणीकडे दुर्लक्ष करीत, प्रसंगी सहन करीत, त्याने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. सर ॲण्डी मरे यांचा वारसदार म्हणून त्याच्याकडे इंग्लंडमध्ये पाहिले जाते.
अवघा १९ वर्षीय जॅक, वयाच्या १४-१५ व्या वर्षी टेनिसकडे खऱ्या अर्थाने वळला आणि गेल्या चार वर्षांत त्याने एटीपी आणि अन्य स्पर्धांत मारलेली धडक कौतुकास्पद आहे. गेल्या आठवड्यात विम्बल्डनला सुरुवात झाली. वाईल्ड कार्डद्वारे त्याला विम्बल्डनमध्ये प्रवेश मिळाला. पहिलीच लढत स्टार खेळाडू जोकोविचविरुद्ध. पहिला सेट त्याने ६-४ असा नेटाने जिंकला. नंतर अपेक्षित होते तेच घडले; जोकोविचने त्याला डोके वर काढू न देता सरळ तीन सेट जिंकत सामना खिशात घातला. जॅकला हा सामना खूप काही शिकवून गेला.
ड्रॅपर कुटुंबीयांच्या रक्तात खेळ, विशेषतः टेनिस आहे. त्याचे आजोबा, काका आणि आईसुद्धा उत्तम टेनिसपटू आहेत. वडील अलेक्झांडर तर स्वतः उत्तम खेळाडू आणि नंतर इंग्लंड टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांचा धाकटा जॅक. त्याला फुटबॉलची आवड. त्यामुळे चेल्सी क्लबच्या ज्युनिअर विभागात तो भरती झालेला. घरात टेनिस होते; पण मरे यांचे सामने बघता बघता तो टेनिसच्या प्रेमात कधी पडला, हेच त्याला कळाले नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने विम्बल्डनमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात केली. छोट्या-मोठ्या स्पर्धांतून त्याने छाप पाडली.
मोठ्या व्यक्तीचा मुलगा असणे अनेकदा कसे त्रासदायक असते, याचा अनुभव त्याने गेल्या चार वर्षांत पुरेपूर घेतला आहे. तो अलेक्झांडर यांचा मुलगा म्हणून त्याला सुविधा अधिक, अशी एक चुकीच्या माहितीवर आधारित अफवा पसरली होती. त्यामुळे त्याच्या वयोगटातीलच मुले त्याची हुर्यो उडवायची. सामन्यात तो कसा हरेल, असे स्लेजिंग करायची. अगदी सर्व्हिस करतानादेखील. पहिल्यांदा त्याला त्याचा खूप त्रास व्हायचा. पण प्रशिक्षकांनी त्याला फक्त टेनिसवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. एका ऑस्ट्रेलियन ज्युनिअर खेळाडूने एका मुलाखतीत जॅक ड्रॅपरविरोधात जिंकायला आवडेल, असे सांगितले होते.
ती मुलाखत पाहून त्याच्या लक्षात आले, की स्थानिक सोडले तर जग आपल्या खेळाची दखल घेत आहे. त्यामुळे तो टेनिसकडे अधिक गांभीर्याने पाहू लागला. सातत्यपूर्ण मेहनत, मोठ्या वा मातब्बर खेळाडूंचे यूट्यूबवर सतत व्हिडिओ पाहून आपले तंत्र सुधारत न्यायचे आणि सरावातील सातत्य, या त्रिसूत्रीवरच त्याने आजपर्यंतचे यश गाठले आहे. या दरम्यानच घडलेल्या कौटुंबिक ताण-तणावातूनही त्याने स्वतःला सावरले. जवळपास सहा फूट उंच, शिडशिडीत बांधा, उत्तम दमसास असलेला जॅक अतिशय चिवट आहे. २०१८ मध्ये तो ज्युनिअर विम्बल्डनचा उपविजेता होता. त्या गटात त्याने सातव्या मानांकनापर्यंत मजल मारली होती. त्याने आयटीएफची सात विजेतेपदे पटकाविली आहेत. जागतिक खुल्या गटात एटीपी मानांकनात सध्या तो २५०व्या स्थानी आहे. इंग्लंडच्या रॅंकिंगमध्ये आठव्या स्थानी आहे. गेला आणि यंदाचा हंगाम त्याच्यासाठी खास होता. गेल्या वर्षी त्याने एटीपी विजेतेपदासह तीन चषक जिंकले. तो निश्चितच इंग्लंडचे नवे आशास्थान आहे आणि त्याच वेळी ॲण्डी मरे सरांचा वारसदारही!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.