India Vs Ireland 2nd T20I : भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2 - 0 अशी खिशात घातली. भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने सलामीवीर अँड्र्यू बारबिर्नेच्या झुंजार 72 धावांच्या जोरावर 152 धावांपर्यंत मजल मारली. (Jasprit Bumrah Prasidh Krishna)
भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यात स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. त्याने 20 व्या षटकात बाईजच्या 4 धावा सोडल्या तर एकही धाव दिली नाही. जुना बुमराह पहायला मिळाल्याने चाहते देखील आनंदले. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहचा हा कर्णधार म्हणून पहिला मालिका विजय आहे.
भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंड संघाची अवस्था पॉवर प्लेमध्येच बिकट झाली होती. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने स्टिर्लिंग आणि टकर यांना शुन्यावर बाद केले. यानंतर रवी बिश्नोईने हॅरी टेक्टरचा 7 धावांवर त्रिफळा उडवत आयर्लंडची अवस्था 3 बाद 28 अशी केली.
यानंतर एका बाजूने झुंजार खेळी करणारा सलामीवीर अँड्र्यू बलबिर्ने आणि कर्टिस कॅम्पहरने आयर्लंडला अर्धशतकी मजल मारून दिली. रवी बिश्नोईने कॅम्पहरला 18 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
दरम्यान, अर्धशतकापर्यंत पोहचलेल्या अँड्र्यूने जॉर्ज डॉक्वेलसोबत 52 धावांची भागीदारी रचत संघाला 15 व्या षटकात शतक पार पोहचवले. मात्र जॉर्ज रनआऊट झाला अन् आयर्लंडची डाव घसरण्यास सुरूवात झाली.
अर्शदीप सिंगने 51 चेंडूत 72 धावांची खेळी करणाऱ्या बारबिर्नेला बाद करत आयर्लंडची उरली सुरली आशा देखील संपवली. यानंतर बुमराहने मॅककार्थेला 2 धावांवर बाद करत आपले खाते उघडले.
मात्र तळातील फलंदाज मार्क अडैरने शेवटच्या दोन षटकात आक्रमक फलंदाजी करत आयर्लंडला 150 धावांच्या पार पोहचवले. त्याने 15 चेंडूत 23 धावांची खेळी केली. अखेर भारताने आयर्लंडला 20 षटकात 8 बाद 152 धावात रोखले. भारताने सामना 33 धावांनी जिंकला.
भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंविरूद्ध विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा चोपल्या.
संजू आणि ऋतुच्या 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंहने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये 21 चेंडूत 38 धावा करत भारताला 180 च्या पार पोहचवले. त्याला शिवम दुबेने 16 चेंडूत नाबाद 22 धावा करत चांगली साथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.