कँडी : भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये येत्या दोन सप्टेंबरला आशियाई क्रिकेट करंडकातील महत्त्वाची लढत होणार आहे. या लढतीत मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज यांच्यापैकी कोणत्या दोन गोलंदाजांना भारताच्या अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येते, याचे उत्तर शनिवारी प्रत्यक्ष लढतीच्याच दिवशी मिळेल.
पण त्याआधी मोहम्मद शमी याने आपण नव्या असो किंवा जुन्या कोणत्याही चेंडूने गोलंदाजी करण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच भारतीय संघ व्यवस्थापनाकडून जे सांगण्यात येईल, त्याचे पालन करीन. सुरुवातीच्या किंवा मधल्या, तसेच अंतिम टप्प्यात गोलंदाजी करायला तयार असेन, असेही शमीकडून स्पष्ट करण्यात आले.
बुमरा, सिराज आणि मी, आमच्या तिघांकडून छान कामगिरी होत आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल. खेळपट्टी व वातावरणावरही अवलंबून असणार आहे, पण संघाला कोणत्याही क्षणी माझी गरज भासल्यास मी तयार असेन, असे शमीने आवर्जून सांगितले.
शमीने ९० एकदिवसीय सामन्यांमधून १६२ विकेट घेतल्या आहेत. आशियाई व विश्वकरंडक या दोन्ही स्पर्धांच्या दृष्टिकोनातून शमी भारतासाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो. यावर शमीने मात्र क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्यास यश मिळू शकते, असे स्पष्ट केले. लाल चेंडू असो किंवा सफेद चेंडू, तसेच झटपट क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट, कुठेही १०० टक्के सर्वोत्तम प्रयत्न केल्यास अडचण निर्माण होत नाही, असे तो स्पष्ट करतो.
दुखापतीमुळे जसप्रीत बुमरा भारतीय संघाबाहेर होता. त्याच्यासारखा अव्वल दर्जाचा खेळाडू संघात असायला हवा, असे नेहमीच वाटत होते. त्याचे आता भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तो तंदुरुस्त झाला आहे. तो नेटमध्ये छान गोलंदाजी करीत आहे. आशियाई करंडकात आमच्याकडून चमकदार कामगिरी होईल.
- मोहम्मद शमी, वेगवान गोलंदाज, भारत
कसून सराव
आशियाई करंडक व विश्वकरंडक या दोन महत्त्वाच्या स्पर्धा होत आहेत. अशा स्पर्धांच्या आधी सराव महत्त्वाचा भूमिका बजावतो. भारताच्या सर्व खेळाडूंनी कसून सराव केला आहे. चांगल्या योजना अमलात आणल्यास, तसेच लक्ष्य केंद्रित केल्यास यश मिळू शकेल, असे शमी स्पष्ट करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.