क्रिकेटच्या मैदानावर देव-देवतांचे भक्तिसंगीत वाजवले जाणे फारच अपवादात्मक असते, पण दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू रामभक्त केशव आत्मानंद महाराज मैदानात येतो तेव्हा मैदानावरील डीजेकडे खास मागणी केली जाते आणि ‘राम सिया राम... सिया राम... जय राम...’ हे भक्तिगीत वाजवले जाते तेव्हा मैदानात प्रसन्नता निर्माण होते आणि आपल्याला खेळायला वेगळी ऊर्जा मिळते असे केशव महाराज म्हणतो.
दक्षिण आफ्रिकेची टी-२० लीग उद्यापासून सुरू होत आहे. केशव महाराज डर्बन सुपरजायंटस् संघाचा कर्णधार आहे. या लीगसंदर्भात पीटीआयशी बोलताना केशवने आपली रामभक्ती पुन्हा एकदा जाहीरपणे व्यक्त केली.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय क्रिकेटपटूंनी केशवच्या रामभक्तीची पुन्हा एकदा अनुभूती घेतली. एकदिवसीय मालिकेत केएल राहुल कर्णधार होता. केशव फलंदाजीस आल्यावर यष्टिरक्षक असलेल्या राहुलने हे अगदी जवळून अनुभवले होते.
केपटाऊन येथील कसोटीत केशव फलंदाजीस आला त्या वेळी हे भक्तीगीत वाजताच स्लीपमध्ये असलेल्या विराट कोहलीने दोन्ही हात जोडत नमन तर केलेच, पण रामाची धनुष्यबाण मारत असलेली मुद्राही केली होती.
केशव डर्बन येथे जन्मलेला असला तरी त्याचे कुटुंबीय भारतीय वंशाचे आहेत. केशव हा दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा हुकमी फिरकी गोलंदाज आहे. त्याने ५० कसोटीत १५८ विकेट मिळवलेल्या आहेत. न्यूलँडस् येथील भारताविरुद्धची कसोटी दोन दिवसांत संपल्याचा खेद त्याने व्यक्त केला. वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व राखलेल्या या सामन्यात केशवला गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.
माझ्यासाठी देवाचे आशीवार्द सर्वांत महत्त्वाचे आहेत. मला शक्य झाले तर तुम्हा सर्वांना या भक्तिरसात सामावण्यासाठी प्रयत्न करेन. धर्म आणि संस्कृतीचा आदर करणे फार महत्त्वाचे असते. राम... सिया... राम संगीताची धून वाजते तेव्हा फार प्रसन्न वाटते.
- केशव महाराज
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.