कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने राजर्षी शाहू खासबाग मैदानात लढती झाल्या.
कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (Maharashtra Kesari Prithviraj Patil) याने उपमहाराष्ट्र केसरी भारत मदने याला अवघ्या दोन मिनिटांत बॅक थ्रो डावावर अस्मान दाखवत खासबाग केसरीचा (Khasbag Kesari) मान मिळवला. तो सहा किलो चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. महाराष्ट्र चॅम्पियन मोईन पटेल याने पैलवान आनंदा जाधव याला एकचाक डावावर चितपट केले. अन्य प्रमुख लढती बरोबरीत राहिल्या. महिलांच्या लढती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या झाल्या.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj Jayanti) यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त खासबाग केसरी कुस्ती मैदान (Khasbag Kesari Wrestling Ground) झाले. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने राजर्षी शाहू खासबाग मैदानात लढती झाल्या. कोल्हापुरातील स्थानिक पैलवानांतर्फे मैदानाचे आयोजन केले होते.
प्रथम क्रमांकाची लढत सुरू होताच आक्रमक भारतने पृथ्वीराजला बाहेरची टांग लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून सहीसलामत सुटत पृथ्वीराजने त्याच्यावर ताबा मिळवला. भारतच्या पोटाभोवती हाताची पकड मजबूत केली. मध्येच उठून गुडघा भारतच्या मांडीवर ठेवून त्याला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. अंगाने धिप्पाड भारतवर पृथ्वीराज कोणता डाव टाकणार, याची उत्सुकता दाटली असताना त्याने भारतला बसूनच बॅक थ्रो डावावर अस्मान दाखवले. मुख्य पंच संभाजी वरुटे यांनी तो विजयी झाल्याचे घोषित केले, तर भारत या डावावर चकीत होऊन मैदानातून बाहेर पडला.
द्वितीय लढतीत उमेश चव्हाण विरुद्धचा पैलवान संग्राम पाटील मैदानात उतरला नाही. त्याच्याऐवजी भैरू माने याने उमेशविरुद्ध लढतीची तयारी दर्शवली. दोघांत काही काळ लढत झाली. मात्र, ती बरोबरीत सोडविण्यात आली. महाराष्ट्र चॅम्पियन मोईन विरुद्ध आनंदा जाधव लढला. मोईनने आनंदावर ताबा मिळवत घुटना डाव टाकण्याचा प्रयत्न केला. तो फसल्यावर त्याने एकचाक डावावर आनंदाला पराभूत केले. किरण जाधव विरुद्ध सुशांत तांबूळकर यांच्यातील उशिरापर्यंत चाललेली लढत अखेर बरोबरीत सोडविण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पदक विजेता सोनबा गोंगाणे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन नाथा पोवार यांच्यातील लढत डाव-प्रतिडावांनी रंगली; पण रेंगाळल्याने बरोबरी सोडविण्यात आली. महाराष्ट्र चॅम्पियन अरुण बोंगर्डे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन राघू ठोंबरे यांच्यातील लढतही बरोबरीत सोडविण्यात आली. महाराष्ट्र चॅम्पियन ओमकार भातमारे याने महाराष्ट्र चॅम्पियन उदय शेळके याला पराभूत केले.
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते पृथ्वीराजला गदा देण्यात आली. या वेळी हिंदकेसरी संतोष वेताळ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे, शाहू विजयी गंगावेस तालमीचा पैलवान संग्राम कांबळे, डॉ. मेघा कांबळे, पैलवान गुंडाजी पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, पैलवान बाबा महाडिक उपस्थित होते. पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मारुती जाधव, शिवसेनेचे शंकर वीरकर, रणजित जाधव, कृष्णराज महाडिक, गजराज कांबळे, विराट मडके, माजी नगरसेवक ईश्वर परमार, रणजित शेलार, अजित नरके यांनी मैदानास भेट देऊन कुस्ती लढती पाहिल्या.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज याचा भाऊ राजवर्धन पाटील मैदानात उतरला होता. त्याने प्रतिस्पर्धी पैलवानाविरुद्ध विजय मिळवला. सांगलीच्या भोसले व्यायामशाळेचा छोटा पैलवान निखिल माने विरुद्ध जय मल्हार संकुलचा कृष्णा माने यांच्यात लढत झाली. त्यात निखिलने कृष्णावर पकड मजबूत करत त्याला घिस्सा डावावर पराभूत केले. या लढतीला प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळाली.
महिलांच्या लढतीत साक्षी सलगर (दोनवडे), देविका गेजगे (खंजिरे कुस्ती केंद्र), तृप्ती गुरव (आनूर), अंकिता जाधव (दोनवडे), शारदा माळवी, स्नेहल पाटील (एन. आय. एस. कुस्ती केंद्र), ईश्वरी होलमुखे (मरळी), आराधना नाईक (दोनवडे) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. दरम्यान, मैदानात कुस्ती निवेदकाने बोगस पासवर लढती झाल्याचे स्पष्ट केले. संयोजकांनी निश्चित केलेल्या लढतींत बदल परस्पर बदल करून, या लढती झाल्या होत्या. त्यामुळे निवेदकाने बोगस पासवर लढती घेऊ नयेत, असे आवाहन केले.
शाहीर रणजित कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर पोवाड्याचे सादरीकरण
मैदानात जुन्या पैलवानांचे लक्षवेधी फलक
चटकदार लढतींना शौकिनांकडून रोख बक्षिसे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.