- रोहिणी गोसावी
ऑलिंपिकमध्ये काही प्रथा आणि परंपरा गेली अनेक वर्षे चालत आलेल्या आहेत; पण सर्वसामान्यांना माहीत नाहीत. म्हणजे स्पर्धा जिंकल्यानंतर विजेते खेळाडू काही विशिष्ट कृती करतात.
मॅरेथॉन जिंकलेला खेळाडू मोठी घंटा का वाजवतो किंवा स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंना पदकांसह फुलं का दिली जातात, खेळाडू त्यांची पदके तोंडात का धरतात, अशा अनेक गोष्टी ज्यांना ऑलिंपिकच्या परंपरा म्हणतात. यातल्या काही दिसतात तर काही दिसत नाहीत. आज जाणून घेऊयात ऑलिंपिकच्या अशाच काही परंपरांविषयी.
ऑलिंपिकमधल्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये विजयी झालेला खेळाडू एक मोठी घंटा वाजवतो. त्याला विनर्स बेल म्हणजे विजयी खेळाडूसाठीची घंटा म्हणतात. आपला विजय साजरा करण्यासाठी आणि मी ही स्पर्धा जिंकली, असं सगळ्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आणि इतर स्पर्धकांना प्रोत्साहीत करण्यासाठी ही घंटा वाजवली जाते.
खरेतर १,५०० मीटरच्या पुढच्या स्पर्धांसाठी ही घंटा वापरली जाते. पूर्वी म्हणजे लांब पल्ल्याच्या स्पर्धा व्हायच्या तेव्हा शेवटचा टप्पा समजावा, यासाठी ही घंटा वाजवली जायची, ज्यामुळे स्पर्धक आपली संपूर्ण ताकद लावून स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करायचे. जसे तंत्रज्ञान बदलत गेले तसतसे या घंटेची जागा डिजिटल अलार्मने घेतली; पण जिंकणाऱ्या खेडाळूने ही घंटा वाजवण्याची परंपरा मात्र अजूनही सुरू आहे.
ऑलिंपिक स्पर्धांचा एक झेंडा प्रत्येक स्पर्धेदरम्यान फडकवला जातो. हा झेंडा ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी यजमान देशाचा खेळाडू तो परेड ऑफ नेशन्सच्या दरम्यान आडवा पकडून आणतो आणि नंतर तो उभारला जातो.
या वेळी यजमान देशातला एक खेळाडू, एक प्रशिक्षक आणि एक रेफ्री शपथ घेतात की, ही ऑलिंपिक निष्पक्षपणे खेळवली जाईल. या ध्वजाजवळ यजमान देशाचा ध्वज असतो, कारण त्या देशात स्पर्धा होत असतात आणि ग्रीक ध्वज असतो, कारण तिथून ऑलिंपिकची सुरुवात झालीये. ऑलिंपिकच्या समारोप समारंभात हा ध्वज उतरवला जातो आणि पुढच्या ऑलिंपिक स्पर्धांच्या यजमान देशाकडे सोपवला जातो.
ट्रुस वॉल हा आधुनिक ऑलिंपिकमधली महत्त्वाची परंपरा मानली जाते. पूर्वी स्पर्धेदरम्यान जर एखाद्या देशात युद्ध सुरू असेल आणि ऑलिंपिक खेळाडू तेथून जाणार असतील तर त्यांच्यासाठी तेवढा वेळ युद्धबंदी करण्यात येत असे. खेळाच्या माध्यमातून जागतिक शांततेचा संदेश देण्याचा हा प्रयत्न होता. त्याचंच प्रतीक म्हणून आजही सगळे खेळाडू भिंतीवर स्वाक्षरी करून ऑलिंपिकदरम्यान शांतता आणि बंधूता पाळण्याची शपथ घेतात.
मॅस्कॉट हा ऑलिंपिक स्पर्धांचा महत्त्वाचा भाग आहे. १९६८च्या ग्रेनोब्ल हिवाळी ऑलिंपिकमध्ये सगळ्यात आधी हा मॅस्कॉट बनवण्यात आला होता. तो होता स्किइंग करणारा बाहुला. त्यानंतर प्रत्येक ऑलिंपिकमध्ये यजमान देशाने त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीनुसार एका व्यक्तिरेखेला ऑलिंपिक मॅस्कॉट म्हणून वापरायला सुरुवात केली.
याचा वापर ऑलिंपिकच्या मार्केटिंगसाठी केला जातो. ऑलिंपिक काळात तयार करण्यात येणारे कपडे, बॅग्ज, खेळणी या सगळ्यांवर हे मॅस्कॉट रंजक पद्धतीने वापरून व्यवसायवृद्धीला मदत होते.
ऑलिंपिकमध्ये विजेत्या स्पर्धकांना पदकांसोबतच एक पुष्पगुच्छ दिला जातो. १९३६च्या बर्लिन ऑलिंपिकपासून या पुष्पगुच्छाची जागा झाडांच्या सॅपलिंगने घेतलीये. १९३६ मध्ये विजेत्यांना पाइन वृक्षांचे सॅपलिंग दिले गेले आणि जगभरात हे वृक्ष लावण्यात आले, त्यातले काही वृक्ष आजही अस्तित्वात आहेत. तेव्हापासून विजेत्यांना यजमान देशातील पारंपरिक किंवा त्या देशाची ओळख असलेल्या वृक्षांचे सॅपलिंग्ज देण्याची परंपरा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.