- स्वदेश घाणेकर
Country's Superhero Vinesh Phogat: विनेश फोगाटने जेव्हा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तिचे तीन फोटो चटकन समोर आले... २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दुखापतीमुळे उपांत्यपूर्व फेरीची लढत अर्धवट सोडताना ढसाढसा रडणारी विनेश.... त्यानंतर २०२१ मध्ये टोकियोत अपयशाने खचलेली आणि अगदी काही महिन्यांपूर्वी जंतरमंतरवर पोलिसांकडून फरफटत नेली जात असलेली विनेश.. मागील ८ तासांत विनेशने केवढा मोठा पल्ला गाठलाय याचा अंदाज बांधणे खरंच अवघड आहे...
दुपारी ३.०४ वाजता मॅटवर पहिली लढत खेळण्यासाठी उतरण्यापूर्वी ती काही लोकांसाठी बंडखोर होती आणि रात्री १०.३० पर्यंत ती १४० कोटी भारतीयांसाठी नॅशनल हिरो बनली.... असं या ८ तासांत नक्की तिनं काय केलं आणि त्यापूर्वी नेमकं असं काय घडलं होतं हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे...
विनेशला घरच्यांकडूनच कुस्तीचं बाळकडू मिळालं... तिच्या चुलत बहिणी गीता आणि बबिता यांनी राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल विनेशही कुस्तीत आली आणि आज ऐतिहासिक कामगिरी केली. राष्ट्रकुल व आशियाई अशा दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला कुस्तीपटू आहे. शिवाय एकापेक्षा अधिक जागतिक स्पर्धेची पदकं नावावर असलेली ती एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. प्रतिष्ठीत लॉरीयस वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कारासाठी मानांकन मिळालेली पहिली भारतीयही तिच आहे... आता ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीची फायनल खेळणारी पहिली भारतीय महिला पण आहे...
पण, मागील वर्षभरात एक 'बंडखोर' म्हणून विनेश जगासमोर आली होती... भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात विनेश, बजरंग, गिता आदी ऑलिम्पियन खेळाडूंसह अनेक कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले होते... ब्रिजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या खेळाडूंचा होता आणि न्यायालयात खटला सुरू आहे... पण, खेळाडूंनी या वादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा आणि ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करावी असा जोर त्यांनी धरला होता... त्यात मग विरोधकही कुस्तीपटूंच्या बाजूने उभे राहिले आणि आंदोलनाला राजकिय रंग आला... आंदोलनासाठी ४० दिवस ती फुटपाथतवर झोपली होती... देशासाठी मिळवलेली पदकंही ती गंगेत विसर्जित करण्यासाठी गेली होती, राष्ट्रपती भवनच्या गेटवर तिने तिची पदकंही ठेवली होती.. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून तिला मारले गेले... फरफटत नेले गेले.. पण ती तिच्या मागणीवर ठाम राहिली... या सर्व प्रकरणात तिच्यासह आंदोलक कुस्तीपटूंवर खालच्या दर्जाची टीका झाली. त्यांना ट्रोल केले गेले... इतकेच काय तर या खेळाडूंनी देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेला मान हे ट्रोलर्स विसरले आणि त्यांच्यासाठी सरकारकडून केल्या गेलेल्या खर्चाचा हिशोब मांडण्याचे काम काहींकडून झाले...
आजही जेव्हा विनेशने पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीतत अव्वल स्थानावर असलेल्या आणि मागील ८२ लढतीत अपराजित असलेल्या जपानच्या युई सुसाकीला चीतपट केले, तेव्हाची काहिंच्या तोंडी कौतुक कमी तिच्यावर केलेल्या खर्चाचा हिशोब आला... अर्थात याकडे विनेश फार लक्ष देते असे नाही. कारण मागील सहा महिन्यात जन्मभराची शिकवण तिला मिळाली होती...
''ये लड़की अपने देश में लातों से कुचली गई थी
ये लड़की अपने देश में सड़कों पर घसीटी गई थी
ये लड़की दुनिया जीतने वाली है मगर इस देश में सिस्टम से हार गई थी'' हे ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनियाचं ट्विट तिच्या या खडतर प्रवास मोजक्या शब्दात मांडण्यासाठी पुरेसं आहे...
१७ ऑगस्ट २०२३ मध्ये विनेशच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती आणि ८ दिवसांनी म्हणजेच २३ ऑगस्टला तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी लवकरच पुन्हा पायावर उभं राहण्याचे वचन दिले होते आणि आज ६ ऑगस्ट २०२४ मध्ये ती ऑलिम्पिक फायनल खेळणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.
एखादा खेळाडू जेव्हा पदक जिंकतो, तेव्हा आपण भारतीय म्हणून त्याला डोक्यावर घेतो... त्याचं कौतुक करतो, तिच्या किंवा त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी झगडतो.. पण, हेच खेळाडू जेव्हा एखादी मागणी घेऊन रस्त्यावर उतरतात, तर त्याला वाईट पद्धतीने ट्रोल केले जाते... विनेश, बजरंग, गिता यांचा आंदोलनामागचा हेतू कदाचित दुसरा असेल, पण त्यांना ट्रोल करताना त्यांनी देशाचा तिरंगा जगभरात मानाने फडकावला आहे, हे सोईनुसार जंतरमंतर प्रकरणानंतर ट्रोलर्स विसरले होते... आज त्यांची अवस्था 'मार सोसेना आणि सहनही होईना' अशी झाली असावी...
विनेशला जेव्हा उपांत्य फेरीच्या लढतीनंतर पत्रकारांनी काही प्रश्न विचारू केले, तेव्हा ती म्हणाली फायनल के बाद बोलूंगी, अभी नही! यावरून तिचा दृढनिश्चच किती पक्का आहे हे समजते.. गेल्या वर्षभरात आलेल्या अनुभवानंतर पॅरिसमध्ये जायचं आणि पदक जिंकायचं हा निर्धार तिने मनाशी पक्का केला होता आणि मागील ८ तासांत तिने तो कृतीतही उतरवला... तिचा 'बंडखोर ते नॅशनल हिरो' हा प्रवास पाहिला तर तिला संघर्षकन्या म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
''Dear Haters, I Have so much more for you. To be MAD at. Just be Patient'' विनेशने जानेवारी २०२४ मध्ये टीकाकारांना दिलेला हा सल्ला आज तिने खरा करून दाखवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.