मुंबई : सर्वाधिक ४१ वेळा विजयी ठरलेल्या मुंबईच्या संघासमोर उद्यापासून सुरू होणाऱ्या रणजी क्रिकेट करंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तमिळनाडूचे आव्हान असणार आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या लढतीत मात्र सर्वांच्या नजरा श्रेयस अय्यरच्या फलंदाजीवर खिळलेल्या असणार आहेत.
श्रेयस अय्यरला भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला. यासाठी त्याने दुखापतीचे कारण सांगितले, पण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून तो तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर बीसीसीआयकडून त्याच्यासह इशान किशन यालाही करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून बाहेर काढण्यात आले. या घडामोडीनंतर रणजी करंडकाच्या उपांत्य लढतीसाठी तो उपलब्ध असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले. श्रेयस अय्यरवर या लढतीत खेळताना निश्चितपणे दबाव असणार आहे. यामधून तो कसा बाहेर येतो व आपला ठसा उमटवतो हे पाहणे रंजक ठरेल.
मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याला यंदाच्या रणजी मोसमात प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. अवघे एक अर्धशतक त्याने झळकावले आहे. यामुळे त्याच्या फलंदाजीकडेही लक्ष असणार आहे. पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान यांना फलंदाजीत चमक दाखवावी लागणार आहे. मुंबईच्या गोलंदाजांना अविस्मरणीय कामगिरी करता आली नसली तरी मोहित अवस्थी, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे यांच्याकडून अपेक्षा बाळगता येऊ शकणार आहेत. मुंबईची तगडी फलंदाजी बघता खेळपट्टी ही फलंदाजांना पोषक अशी असण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यरच्या आगमनामुळे मुंबई संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. मुंबईसाठी खेळताना त्याच्या बॅटमधून नेहमीच धावा होतात. त्यामुळे त्याला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. त्याच्यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणही चांगले असणार आहे.
- अजिंक्य रहाणे, कर्णधार, मुंबई क्रिकेट संघ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.